पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मरणार्थ सभागृह बांधणीसाठी 30 कोटी रुपयाची तरतूद
श्रीरामपुर - धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राज्यसभा खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे. राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समाजमंदिर उभारण्यासाठी 30 कोटी रुपयाची घोषणा केली आहे.
खासदार डॉ. विकास महात्मे यांनी राज्याचे वित्तमंत्री मा. सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री मा. देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील 350 गावांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह उभारण्यासाठी तसेच या गावांच्या विकासासाठी आगामी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्याची विनंती केली होती. त्यांच्या या विनंतीस सकारात्मक प्रतिसाद देऊन मा. वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्पा मध्ये 30 कोटी रुपये मंजूर करण्याची घोषणा केली. धनगर समाज संघर्ष समितीसाठी वर्ष 2013 पासून राज्यभर अनेक दौरे डॉ. महात्मे यांनी केले. हे दौरे करताना त्यांनी अनेक गावांना भेटी देऊन मुक्काम केला. जेथे पिण्याच्या पाण्यासारख्या पायाभूत सुविधाही नाहीत. अशी जवळपास 350 गावे अधोरेखित करून त्या गावांची यादी डॉ. महात्मे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सुपूर्त केली होती.
धनगर समाज संघर्ष समितीच्यावतीने पद्मश्री खा. डॉ. विकास महात्मे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करतांना करून आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी आ. देवयानी फरांदे, समितीचे प्रदेशाध्यक्ष बापुसाहेब शिंदे, ख्वाडा व बबन चित्रपटाचे डायरेक्टर भाऊराव कराडे, मुंबई विभागाचे अध्यक्ष राजेंद्र बर्गे, नाशिक जिल्हाध्यक्ष नवनित वजिरे, सांगली जिल्हाध्यक्ष प्रा. कृष्णा अलदर, नाशिक जिल्हा संघटक सुदाम लोंढे आदि उपस्थित होते.