Breaking News

दरोड्याच्या तयारीत असणारे चौघे पोलिसांच्या जाळ्यात


कर्जत: दरोड्याच्या तयारीत असणारे 4 जण गावठी कट्यासह 6 जिवंत काडतुसासमवेत कर्जत पोलिसांनी जेरबंद केले. दि. 24 मे रोजी कर्जतहून श्रीगोंद्याकडे जाताना एका इनोव्हा गाडीमध्ये गावठी कट्यासह काही युवक दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती कर्जतचे पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांना मिळाली. त्यांनी उपविभागीय पो. अधिकारी सुदर्शन मुंडे यांना माहिती कळविताना पोलिस उपनिरीक्षक शहादेव पालवे यांचे मार्गदर्शनाखाली पाच पोलिसांची टीम बनवून रवाना केली. कर्जत पोलिसांना दुर्गाव तलावाजवळ इनोव्हा गाडीजवळ पाच सहा जण उभे असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांना हटकले असता, एक जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला तर, तिघे इनोव्हा गाडी (एमएच 14 ईपी 8163) मधून पळून गेले. तर पोलिसांनी एकास जागेवरच पकडले, आणि श्रीगोंद्याकडे पळून जाऊ लागलेल्या गाडीचा पाठलाग केला. श्रीगोंद्याचे पोलिस उपनिरीक्षक कांबळे यांना याबाबत कळविले. 

त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव यांच्या पथकाने श्रीगोंदा शहरात नाकाबंदी सुरु केली. काही पोलिस कर्मचार्‍यांनी हिरडगाव चौफुला येथे सापळा रचला. भरधाव वेगाने जाणारी ही गाड़ी हिरडगाव चौफुला येथे अडविण्याचा प्रयत्न केला मात्र ते शक्य झाले नाही. श्रीगोंदा शहरातील असणार्‍या घोडेगाव चौकात ही इनोव्हा गाड़ी आली असता पोलिसांनी ती थांबविन्याचा प्रयत्न केला. कर्जत पोलिसांचे पथकाने सिनेस्टाइल पाठलाग करून या आरोपींना श्रीगोंद्याजवळ श्रीगोंदा पोलिस समोरून तर कर्जत पोलिस मागे अशा परिस्थितीत आरोपींना अटक करण्यात यश आले. यामध्ये सुनिल सुधिर केमसे (वय 31) रा. केमसेवाडी ता. मुळशी, सुनिल गजानन खाणेकर (वय 28) रा. रसाळवाडी ता. मुळशी, मिथुन मारूती बालघर (वय 32) रा. बेबडओहळ ता. मुळशी, अनिल अंकुश शिंदे (वय 35) रा. रिहे, ता. मुळशी (वाहन चालक) यांचा समावेश असून या कारवाईत उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे व पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शहादेव पालवे, पो.कॉ. हृदय घोडके, सुनील खैरे, सागर जंगम, फिरोज पठाण, अनमोल चन्ने या कर्जत पोलिस पथकाने केलेल्या कारवाईत या इसमांजवळ एक गावठी कट्टा, 6 जिवंत काडतुसे सापडली. यावेळी दरोड्यांच्या तयारीत असलेल्या या चौघा जणांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. 2 आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत, यामध्ये एक इनोव्हा गाड़ी ही जप्त करण्यात आली आहे. याबाबत पो. कॉ. सागर जंगम यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शहादेव पालवे हे करत आहेत.