Breaking News

स्पोडोप्टेरा अळी’ अनेक पिकांसाठी घातक : दवंगे


लोणी / प्रतिनिधी  - लसूणघास या पिकांवर ‘स्पोडोप्टेरा अळी’ या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लसूणघासाच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम होत आहे. या किडीचे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. या किडीचा लसूणघासावर पादूर्भाव झाल्यास खरीप हंगामामध्येसुद्धा सोयाबीन आणि भुईमूगासारख्या पिकाला ही किड मोठ्या प्रमाणात नुकसानकारक ठरू करू शकते, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण शास्त्रज्ञ भरत दवंगे यांनी दिली.

या किडीबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले, या किडीच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुख्य पिकाभोवती एरंडी अगर सूर्यफूल या पिकांची सापळा पीक म्हणून एक ओळ लावावी. या पिकांवर ‘स्पोडोप्टेरा अळी’ दिसू लागताच प्रादूर्भावग्रस्त पाने अळीसहीत नष्ट करावीत. बांधावरील तणांचा किंवा किडीच्या पूरक वनस्पतीचा नाश करावा. लाकडी मचान किंवा पक्षी थांबे शेतात उभे केल्यास पक्षी त्यावर मोठ्या संख्येने येऊन बसतात आणि अळ्यांचे भक्षण करतात. किडीच्या प्रादूर्भावांची पूर्वकल्पना येण्यासाठी सर्वेक्षणाकरिता शेतात एकरी २-३ सापळे शेतात उभे करावेत. या सापळ्यांमध्ये प्रतिदिन ८-१० पतंग सतत २-३ दिवस आढळल्यास शेतांमध्ये सापळ्यांची संख्या वाढवून या किडीचे नर पतंग एकत्रित करून नष्ट करावेत. त्यामुळे मादी पतंग पिकावर अंडी घालू शकत नाहीत. परिणामी अळ्या तयार होण्यावर प्रतिबंध राहील. बिव्हेरिया बॅसियाना अधिक मेटारायझीयम अॅनिसोप्ली या जैविक किटकनाशकाचा प्रती दोन लिटर प्रति एकरी दोन लीटर वापर करावा. जमिनीमधून शेणाच्या स्लरी किंवा सेंद्रिय खतातून वापर करावा. त्याचप्रमाणे सायंकाळच्या वेळी बिव्हेरिया ५ मिली प्रति लिटर अधिक मेटारायझीयम यांची ५ मिली प्रति लिटर पाण्यातून पिकावर फवारल्यास अळ्यांमध्ये रोग पसरून त्याचे जैविक व्यवस्थापन होते. यासाठी फवारणीच्या पाण्यामध्ये गुळाचा वापर करावा. त्याचप्रमाणे एस. एल. एल. पी. व्ही. या विषाणूचासुद्धा वापर केला जाऊ शकतो. वनस्पतीजन्य अर्काचा वापर करताना निंबोळी तेल ३ मिली प्रति लिटर किंवा करंजी तेल २ मिली प्रतिलिटर यांचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अवलंब केल्यास सालीचा वरील सर्व उपाययोजना करूनही अळीचा प्रादूर्भावावर नियंत्रण ठेवता येते. वरील सर्व उपाय योजना करूनही अळीचा प्रादूर्भाव जास्त असेल तर पिकांवर स्पिनोसॅड हे कीटक नाशक ०. ३ मिली प्रति लिटर या प्रमाणात पिकावर फवारावे. मात्र फवारणीनंतर १० दिवसांनंतरच लसूणघासाचा चा-यासाठी वापर करावा.