Breaking News

निराधार मुलामुलींच्या आश्रयासाठी धावला समता परिवार!

कोपरगाव शहर प्रतिनिधी - आज जगात समस्यांचा महापूर आलेला आहे. त्या सोडवायच्या कशा, हा प्रत्येकासमोरचा प्रश्न आहे. मात्र प्रश्न सोडविण्यासाठी तयारी केली पाहिजे, अशी खूणगाठ बांधून येथील समता पतसंस्थेच्या परिवाराने आईवडिलांचे छत्र हरपलेल्या ७० निराधार मुलामुलींच्या आश्रयाला धावत या परिवाराने या संस्थेला एक एकर जागा दान केली.

समता पतसंस्थेच्या कर्मचा-यांनी एक दिवसांचा एक लाख रूपये पगारदेखील यासाठी दिला आहे. राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे समता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्याचप्रमाणे लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष संदीप कोयटे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात माहिती देतांना सामाजिक कार्यकर्ते कोयटे म्हणाले, साईबाबांच्या शिर्डीत अनेकांनी ‘नकोशी’ असलेल्या मुलींना सोडले. अशी ७० निराधार मुलेमुली सामाजिक कार्यकर्ते गणेश दळवी व त्यांच्या कुटूंबियांनी एकत्रित केली. साई आश्रया संस्थेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून या मुलांचे संगोपन केले जात आहे. हीच बाब हेरून कोयटे कुटूंबियांनी यासाठी पुढाकार घेत एक एकर जागा दान करण्याचा निर्णय घेतला.