Breaking News

टप्पा पिंपळगाव येथील ग्रामस्थांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण


पाथर्डी -प्रतिनिधी- तालुक्यातील टप्पा पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर नोकरीसाठी असणारे वैद्यकीय अधिकारी व त्या ठिकाणी नेमणूक असलेले इतर कर्मचारी नियुक्तीच्या ठिक ाणी राहत नसल्यामुळे 24 तास वैद्यकीय सेवा मिळत नाही. 24 तास सेवा मिळावी यासाठी तेथील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण करत आंदोलन केले. टप्पा पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर नेमणूक असलेले वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी टप्पा पिंपळगाव येथे राहत नसल्याने अचानक रात्रीच्या वेळेला गावातील ग्रामस्थांना तातडीची वैद्यकीय सेवा मिळत नाही. त्यामुळे अनेक रुग्णांना मोठया प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागते. या प्रश्‍नासाठी ग्रामस्थांनी सरपंच मंगल सानप यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसभा घेवून प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी गावातच राहून ग्रामस्थांना वैद्यकीय सेवा पुरवावी, सध्या उपलब्ध असलेले कॉट अपुरे असल्याने कॉटची संख्या वाढवण्यात येवून 108 रुग्णवाहिका मिळावी, रक्तलघवी तपासणी सुविधा मिळावी, एक्सरे मशीनची सुविधा पुरविण्यात यावे यासाठी ग्रामसभेचा ठराव घेतला होता. त्यानंतर याबाबत गटविकास अ धिकारी, तहसीलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी यांना लेखी निवेदने देखील दिली होती परंतु या निवेदनावर काहीच कार्यवाही न झाल्याने आपल्या न्याय हक्कासाठी टप्पा पिंपळगाव ग्रामस्थांनी सरपंच मंगल सानप यांच्या नेतृत्वाखाली सकाळी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले. तसेच यावेळी आरोग्य विभागाच्या निष्क्रिय कारभाराविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. उपोषण ठिकाणी गटविकास अधिकारी डॉ.जगदीश पालवे, तहसीलदार नामदेव पाटील यांनी आंदोलक व वैद्यकीय अधिकारी यांच्यात मध्यस्थी केली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी टप्पा पिंपळगाव येथे नेमणुकीस असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. महिंद्रा बांगर तसेच डॉ.अमोल दहिफळे यांच्याकडून मुख्यालयी राहून 24 तास वैद्यकीय सेवा देण्याबाबत हमीपत्र लिहून घेतले व तसे पत्र आंदोलनकर्त्यांना दिल्याने ग्रामस्थांनी उपोषण स्थगित केले. आंदोलनात सरपंच मंगल सानप , मुरलीधर शिरसाठ, संतराम फुंदे, सुमन काळे, गंगुबाई महाजन, अशोक दराडे, नंदूबाई पंडागळे, अशोक शिरसाठ, जगन्नाथ शिरसाठ, निलेश दराडे, सुदर्शन फुंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संखेने आंदोलनात सहभागी झाले होते.