Breaking News

पुणे जिल्ह्यात वन विभागातर्फे वनस्पतींचे सर्वेक्षण

पुणे, दि. 06, मे - जिल्ह्यातील वनक्षेत्रात असणार्‍या वनस्पती प्रजातींची सखोल नोंदणी व्हावी. यासाठी वन विभागातर्फे जिल्ह्यातील वनक्षेत्रांमधील वनस्पतींचे सर्वेक्षण केले जात आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात ताम्हिणी घाटातील वनस्पतींचे सर्वेक्षण केले जात आहे. यातून दुर्मिळ प्रजातींचे संवर्धन होण्यास मोठी मदत मिळणार आहे.
सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वनसंपत्तीचा अनमोल खजिना आहे. मात्र या खजिन्याबाबत विस्तृत अद्ययावत नोंदी मिळणे ही अवघड बाब आहे. हे लक्षात घेत, वनविभागातर्फे याठिकाणच्या वनस्पतींचे सखोल सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणाच्या सुरवात ताम्हिणी पट्ट्यातील वनक्षेत्रापासून करण्यात आली असून, प्रत्येक ऋतुनुसार वनस्पतींच्या नोंदी केल्या जाणार आहेत. नुकत्याच उन्हाळ्यातील वनस्पतींचे सर्वेक्षण पूर्ण झाल्या असून, येत्या जानेवारीपर्यंत संपूर्ण सर्वेक्षण पूर्ण होईल. त्यानंतर वनविभातार्फे जिल्ह्यातील इतर ठिकाणीही अशाप्रकारचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
या सर्वेक्षणांतर्गत भारतातील दोन वनस्पतीशास्त्रज्ञ यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाचे अधिकारी काम करत आहे. यामध्ये ताम्हिणी परिसरातील जंगलात जाऊन तेथील वृक्षांच्या नोंदी केल्या जात आहेत. नेमक्या कोणत्या प्रजातीचे वृक्ष आहे? कोणत्या भागात आहेत? त्यांची संख्या अशा विविध गोष्टी या सर्वेक्षणामध्ये नमूद करण्यात येत आहे. झाडांच्या नोंदी करण्याबरोबरच काही महत्वपूर्ण प्रजातींच्या वनस्पतींची बियाणे गोळा करून विभागाच्या नर्सरीमध्ये त्यापासून रोपेदेखील तयार केली जातील. यामुळे अशा वनस्पतींच्या संवर्धनामध्ये मोठा हातभार लागेल.