Breaking News

पालखी मुक्काम ठिकाणाची सर्व कामे तातडीने पुर्ण करावीत - डॉ. दिपक म्हैसेकर

पुणे, दि. 06, मे - पालखी मुक्कामांच्या ठिकाणी सुरु असणारी सर्व कामे तातडीने पुर्ण करावीत. या कामांसाठी लागणारे भूसंपादन अथवा इतर अडचणी असल्यास त्या सोडवून जुलै पुर्वी हि कामे संपवण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी अधिकार्‍यांना दिल्या. 

येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पालखीमुक्कामांच्या ठिकाणी प्रगतीपथावर असलेल्या कामांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. 
विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर म्हणाले, पालखीमुक्कामांच्या ठिकाणी बसवण्यात येणारे हासमास्ट, पालखीतळासाठीच्या संरक्षक भिंती, फिरते स्वच्छतागृह, सर्व पालखीमुक्कामा ठिकाणी बांधण्यात येणारा पालखी कट्टा तसेच काही ठिकाणी नियोजित सभागृह, आदी सर्व कामे पूर्ण करावीत. शासनाने या कामांसाठी 77 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
विशेष कार्यकारी अधिकारी (तिर्थ क्षेत्र) उत्तम चव्हाण यांनी यावेळी मंजूर झालेला निधी, निधीचे करण्यात आलेले जिल्हानिहाय वितरण व प्रलंबित कामांची माहिती दिली. श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज मंदिर कमिटीच्या विश्‍वस्तांनी पालखी सोहळ्यात येणार्‍या अडचणी तसेच सुरू असलेल्या कामांबाबतच्या हरकती विभागीय अयुक्तांना सांगितल्या.