Breaking News

लग्नपत्रिका वाटण्यासाठी सोशलमिडियाचा आधार!


राहुरी ता. प्रतिनिधी - सध्या सर्वत्र उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. त्यातच लग्नसराईदेखील मोठी आहे. अशातच लग्नपत्रिका वाटण्यासाठी जातांना उन्हाच्या झळा लागत आहेत. परिणामी लग्नघरातील व्यक्ती आजारी पड़त आहेत. मात्र यावर मल्हारवाडी {ता. राहुरी} येथील गावडे आणि आंबी {ता. राहुरी} येथील कोळसे कुटुंबियांनी सोशल मिडियाचा आधार घेत एक चांगला पर्याय शोधला.

या दोन्ही कुटुंबियांनी लग्नपत्रिकेची एक व्हिडिओ क्लिप बनवून फेसबुक, व्हॉट्सअप आणि अन्य सोशल मिडियाच्या माध्यमातून ती प्रत्येक पाहुण्यांना ‘शेयर’ केली. मल्हारवाडी येथील बाबासाहेब सोपान गावडे यांची कन्या उज्वला आणि आंबी येथील भागवत जयराम कोळसे यांचे चिरंजीव अभिजीत यांचा विवाह ४ मे २०१८ रोजी  होणार आहे. या विवाहाचे निमंत्रण या दोन्ही परिवाराने सोशलमिडियाच्या माध्यमातून दिले. सध्या सर्वत्र सोशलमिडियाचा बोलबाला आहे. याच सोशल मिडियाचा वापर करून गावडे आणि कोळसे या परिवाराने हा नवा पर्याय शोधून काढत सर्वांसाठी एक चांगला पायंडा पडला आहे. यामुळे या दोन्ही परिवाराचा पत्रिका छपाईचा खर्च वाचला.लग्नपत्रिका वाटण्यासाठी जो पेट्रोल खर्च होणार होता, तोही वाचला आणि मुख्य म्हणजे उन्हात फिरल्याने आजारी पडण्यापासून या कुटुंबियांचे संरक्षण झाले. खोट्या प्रतिष्ठेपायी नातेवाइकांच्या जीवाशी न खेळता सोशल मिडियाचा असा सकारात्मक उपयोग करून लग्नाचे निमंत्रण देण्याचा गावडे आणि कोळसे कुटुंबियांचा हा उपक्रम खरोखरच अनुकरणीय आहे.


‘सोशलमिडिया’ हे तंत्रज्ञानाचे वरदान!

लग्नपत्रिका या सोशल मिडियाच्या माध्यमातूनच पाहुण्यांपर्यंत पोहोचविण्याचा माझा विशेष आग्रह होता. कारण मी अनेकदा लग्नपत्रिका वाटत असतांना रस्ता अपघातात मृत्यू झाल्याच्या वृत्तपत्रांत बातम्या वाचल्या. त्यामुळे हा निर्णय घेतला. मात्र यामुळे दोन्ही परिवाराचा बराचशा खर्च आणि लाख मोलाचे प्राण वाचले. याचे समाधान असून योग्य वापर केला तर सोशलमिडिया हे तंत्रज्ञानाने आपल्याला दिलेले वरदान आहे. 

उज्वला गावडे (वधू ) 

यंदा उन्हाळा प्रचंड आहे. त्यामुळे पत्रिका वाटणारी व्यक्ति आजारी पडण्याची दाट शक्यता आहे. ही व्यक्ती घरातीलच प्रमुख व्यक्ती आहे. त्यामुळे ऐन लग्नात ही आजारी पडल्यास संबंधित परिवाराच्या विवाह सोहळ्याचा रंगाचा बेरंग होतो. तो टाळण्यासाठी आम्ही सोशल मिडियाच्या माध्यमातून लग्नाचे निमंत्रण देण्याचा निर्णय घेतला.

अभिजीत कोळसे {वर}