Breaking News

आधी केले वृक्षारोपण, मग शुभमंगल

प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील आनंदाच्या क्षणी वृक्षारोपण करून ती आठवण ठेवली पाहिजे. म्हणून पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील बाळासाहेब टकले व राहुरी तालुक्यातील चिकलठाण येथील सोनाली माने या नवदाम्पत्याच्या हस्ते वटवृक्षाची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बाळासाहेब व सोनाली यांचा शुभविवाह चिकलठाण येथे संपन्न होणार होता, तेंव्हा त्यांच्या शुभ हस्ते व शुभविवाहाची आठवण म्हणून म्हसोबा मंदिराच्या परिसरात वटवृक्षाची लागवड करण्यात आली. यावेळी टिंग्या फेम शरद गोयेकर, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक बापूसाहेब रूपनर, मोहन टकले, लतिफ राजे तसेच अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते. हा उपक्रम सृष्टीमित्र परिवाराचे अध्यक्ष लतिफ राजे मागील चार वर्षांपासून राबवित असून या अंतर्गत अनेक रोपांची लागवड यशस्वी झाली आहे. यापुढे जेथे शक्य होईल तेथे माजी विद्यार्थ्यांच्या शुभविवाह प्रसंगी वटवृक्षाची लागवड ही एक चळवळ सृष्टीमित्र परिवारातर्फे केली जाईल, असा निश्‍चय लतिफ राजे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.