’के पश्चिम’ विभागाद्वारे दोन टप्प्यात हटविली 190 अतिक्रमणे
मुंबई, दि. 12, मे - महापालिकेच्या ’के पश्चिम’ विभागातील जोगेश्वरी पश्चिममधील बेहराम बाग परिसरातील रस्त्यासाठी आरक्षित असलेल्या महापालिकेच्या भूखंडावर 190 अतिक्रमणे उद्भवली होती. याबाबत परिमंडळ - 4 चे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही करण्यात आली आहे. या अंतर्गत दोन टप्प्यात अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात येऊन सर्व अ तिक्रमणे हटविण्यात आली आहेत. तसेच सदर भूखंडावर लगेचच नवीन रस्त्याचे बांधकाम देखील सुरु करण्यात आले आहे. हा सुमारे 500 फूट लांबीचा व 120 फूट रुंदीचा रस्ता या वर्ष अखेरीस तयार होईल, अशी अपेक्षा आहे. ज्यामुळे कमलाकरपंत वालावलकर मार्ग (लिंकिंग रोड) ते स्वामी विवेकानंद मार्ग (एस. व्ही. रोड) या दरम्यान वाहतुकीसाठी आणखी एक पर्याय खुला होणार आहे. ज्यामुळे स्वामी समर्थ नगर (लोखंडवाला कॉम्प्लेक्स) ते स्वामी विवेकानंद मार्ग या दरम्यानची वाहतूक अधिक गतीशील होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती ’के पश्चिम’ विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.
महापालिकेच्या ’के पश्चिम’ विभागांतर्गत जोगेश्वरीतील बेहराम बाग परिसरात विकास नियोजन आराखड्यांतर्गत रस्त्यासाठी आरक्षित असलेल्या महापालिकेच्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे उद्भवली होती. या अतिक्रमणांवर गेल्या महिन्यात करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान 130 अतिक्रमणे हटविण्यात आली होती. तर आता करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान उर्वरित 60 अ तिक्रमणे देखील हटविण्यात आली आहेत. दोन टप्प्यात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे आता सदर भूखंड मोकळा झालेला आहे. दुस-या टप्प्यातील अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीस दलाचे विशेष सहकार्य महापालिकेला लाभले. 40 पोलिसांचा ताफा या कारवाईदरम्यान घटनास्थळी तैनात होता. यामध्ये 20 महिला पोलिसांचाही समावेश होता. या कार्यवाहीसाठी 2 जेसीबी, 4 डंपर, 4 लॉरी व इतर आवश्यक साधनसामुग्री वापरण्यात आली. या कारवाईत महापालिकेचे 50 कामगार - कर्मचारी - अधिकारी सहभागी झाले होते, अशी गायकवाड यांनी दिली आहे.
जोगेश्वरीतील सदर भूखंड आता अतिक्रमण मुक्त झाला आहे. मात्र याठिकाणी पुन्हा अतिक्रमण उद्भवू नये यादृष्टीने नवीन रस्त्याचे बांधकाम लवकर हाती घेणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन याठिकाणी लगेचच नवीन रस्ता बांधण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणाच्या जवळच महापालिकेच्या ’पूल’ विभागाचे काम सुरु असल्याने त्यांच्याचद्वारे आता हा रस्ता बांधण्यात येणार आहे. त्यानुसार नवीन रस्ता बांधण्याचे काम सुरु करण्यात आले असून ते प्रगतीपथावर आहे. स्वामी विवेकानंद मार्ग (एस. व्ही. रोड) ते कमलाकरपंत वालावलकर मार्ग (लिंकिंग रोड) या दरम्यान बांधण्यात येणा-या या 500 मीटर लांबीच्या व 120 फूटी रुंदीच्या रस्त्याचे काम या वर्ष अखेरीस पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. या रस्त्यामुळे स्वामी समर्थ नगर (लोखंडवाला का ॅम्प्लेक्स) परिसरातील नागरिकांना वाहतुकीसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार असल्याने परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास देखील मदत होणार आहे, अशीही माहिती यांनी दिली आहे.
