Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने

पुणे  - पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतची नोंदणी पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. 36 नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीचा गटनेता पालिकेचा विरोधी पक्षनेता असणार आहे. त्यामुळे साने पालिकेचे नवे विरोधी पक्षनेते असणार आहेत.

पिंपरी महापालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीचे केवळ 36 नगरसेवक निवडून आले होते. महापालिकेतील सत्ता गेल्यानंतर पाहिल्यांदाच विरोधी पक्षात बसलेल्या राष्ट्रवादीने तगडा मोहरा असलेल्या योगेश बहल यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविली होती. त्याचवेळी प्रत्येकवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्यात येणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. 17 मार्च 2017 रोजी विरोधी पक्षनेतेपदी बसलेल्या बहल यांनी एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर राजीनामा दिला होता.