उन्हाळी हंगामाचे दुसरे आवर्तन सोडले
उजनी धरणामधून कालव्यात पाणी सोडण्यास सुरुवात झाल्यामुळे उजनी उजवा व डाव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. या उन्हाळी हंगामातील पहिल्या आवर्तनामुळे कालवा लाभ क्षेत्रामधील विहिरी व बोअरवेलच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत झालेली होती व त्याचबरोबर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूरचे अधीक्षक अभियंता शिवाजीराव चौगुले यांनी योग्य नियोजन केलेले असल्यामुळे उजनी धरणामधून कालव्यात उन्हाळी हंगामाचे दुसरे आवर्तन योग्य वेळी सुटलेले आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले पाहावयास मिळत आहे व या उन्हाळी हंगामाच्या दुसर्या आवर्तनामुळे शेतकर्यांचा यावर्षीचा उन्हाळा सुखद जाणार आहे. दरम्यान उजनी धरणामध्ये मंगळवारी सकाळी आठ वाजता पाणी पातळी 492.120 मीटर, एकूण पाणी साठा 2029.39 द. ल. घ. मी, उपयुक्त साठा 226.58 द. ल. घ. मी, तर धरणामध्ये एकूण पाणीसाठा 71.66 टीएमसी एवढा असून त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 8 टीएमसी एवढा आहे. धरणाची टक्केवारी 14.93 टक्के एवढी आहे.