Breaking News

पहिली झेडपीची आंतरराष्ट्रीय शाळा वाबळेवाडी

पुणे, दि. 11, मे - राज्यात शंभर आंतरराष्ट्रीय शाळा निर्माण करणार्‍याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्यातील 13 शाळा येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहेत. पुणे जिल्ह्यातील पहिली आंतरराष्ट्रीय शाळा शिरुर तालुक्यातील वाबळेवाडी येथील जिल्हा परिषदेची शाळा असणार आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम, परीक्षा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असणार आहेत.राज्यात सध्या ज्याप्रमाणे राज्य मंडळ, केंद्रीय माध्यमिक मंडळ (सीबीएसई) आणि अन्य मंडळाच्या शाळा चालतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाकडूनही (एमआयईबी) शाळा चालविण्यात येणार आहेत. या मंडळांतर्गत 100 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा चालविण्यात येणार आहेत. शिशुवर्गापासून ते इयत्ता बारावीपर्यंतच्या या शाळा असणार आहेत. त्यानंतर येत्या वर्षात 13 ओजस शाळा सुरू करण्यात येणार आहेत.या शाळांसाठी ऑनलाईन पध्दतीने 378 अर्ज शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले होते. त्यातील जिल्हास्तरीय निवड समितीकडून 109 शाळांची नामांकने देण्यात आली होती. यातून प्रत्येक विभागात उत्कृष्ट काम करणार्‍या 13 ओजस शाळांची निवड करण्यात आली. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांना अभ्यासक्रम तर असणार परंतु त्यासाठी पुस्तके नसतील. विविध उपक्रम,प्रयोग, प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. या शाळांना अंगणवाडीही जोडण्यात येणार आहे.