Breaking News

प्लास्टीक वापरास घाला आळा; निसर्गाचे नुकसान टाळा! विवाह सोहळ्यातून प्लास्टीक मुक्तीचा संदेश

सुपा / प्रतिनिधी ।  पर्यावरणास हानिकारक असलेल्या प्लास्टीक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी दुमाला येथील नवनाथ भाऊसाहेब शिंदे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासताना आपल्या बंधूच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका चक्क कापडी पिशवीतून देताना प्लास्टीक वापरास घाला आळा; निसर्गाचे नुकसान टाळा! म्हणत प्लास्टीक मुक्तीचा संदेश दिला.


सुरभी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष दीपक वाघमारे व यशवंत प्रतिष्ठाणचे संस्थापक नवनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून विवाहातील अनेक अनावश्यक बाबींना फाटा देताना विवाह सोहळयातच डॉ. सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्त्री जन्माचे स्वागत करा हा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली. हजारोंच्या संख्येने उपस्थित असणार्‍या वर्‍हाडी मंडळीत शिंदे यांची विविध सामाजिक संदेश छापलेली निमंत्रण पत्रिका व प्रामुख्याने प्लास्टीक मुक्तीचा संदेश छापलेल्या कापडी पिशवीचीच विशेष चर्चा होती. 
बाजारात खरेदीसाठी गेलेल्या महिला वा नागरीक प्रत्येक वस्तू प्लास्टीकच्या पिशवीत घेऊन येतो. काम झाल्यानंतर त्या पिशव्या उरलेल्या अन्नपदार्थासह इतरत्र उघडयावर फेकून देतात. पिशवीत असणार्‍या केळाच्या साली, पालेभाज्यांचे देठ, शिळया भाकरी वा इतर उरलेले अन्नपदार्थ प्लास्टीक पिशवीसह मुकी जनावरे खातात. त्यामुळे अनेक जनावरांना आजार उद्भवतात, तर अनेक जनावरे पोटात गेलेल्या प्लास्टीकमुळे आपला जीव गमावतात. प्लास्टीक कचरा विघटन होत नसल्याने तो कचरा गटार वा नाल्यात साठला जातो. त्यामुळे पावसाळ्यात गटार नाल्या तुंबल्याने सखल भागात पाणी साठून मच्छर वा डासांचा उपद्रव वाढतो. देशात प्लास्टिक पिशव्या बंदीचा निर्णय झाला असून प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळणे नागरीकांच्या अंगवळणी पडत नसल्याने शिंदे यांनी पुढाकार घेऊन आपल्या बंधूंच्या विवाहाच्या निमंत्रण पत्रिका छापील कापडी पिशवीतून वाटल्या.
शिवाय पिशवीवर एका बाजूने वरवधूचे नाव व कार्यस्थळ छापले असून, दुसर्‍या बाजूने ग्रामस्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, पाणी वाचवा, स्त्री-भ्रूण हत्या टाळा, पर्यावरण संवर्धन आदी विषयांवर म्हणी वा सुविचार लिहून सामाजिक प्रबोधन केले. दुग्धविकास व पशू संवर्धन मंत्री महादेव जानकर व पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी छापील पिशवीतून दिलेल्या निमंत्रण पत्रिकेचे विशेष कौतुक केले.