Breaking News

संगमनेरकरांनी अडविली कचरा वाहने


संगमनेर : संगमनेर खुर्द येथील कचरा डेपोकडे घेऊन जात असलेली नगरपरिषदेची कचरा संकलन करणारी वाहने येथील ग्रामस्थांनी अडविली. आज {दि. १६} दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. शहरातील कचरा संकलित करून तो संगमनेर खुर्द येथील कचरा डेपोत टाकण्यासाठी ही वाहने निघाली होती.
चालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसणे, वाहनांची कागदपत्रे नसणे याबरोबरच अतिरिक्त कचरा वाहून नेत असताना तो बाहेर पडत प्रदूषण होणे असे आरोप यावेळी करण्यात आले. यामुळे सदर वाहने अडविल्याचे ग्रामस्थांनी ‘दैनिक लोकमंथन’शी बोलतांना सांगितले. दरम्यान, संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर उभी वाहने कचरा डेपोत नेण्यात आली.

शहरातील संकलित झालेला कचरा संगमनेर खुर्द येथील कचरा डेपोत टाकण्यासाठी कचरा संकलन करणारी वाहने निघाली होती. ही वाहने संगमनेर खुर्द गावच्या शिवारात आली असता त्यातील कचरा बाहेर उडून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर पडत होता. त्यावेळी संगमनेर खुर्द येथील ग्रामस्थ विलास पाटील गुंजाळ हे तेथून जात असताना त्यांच्या अंगावरही कचरा पडला. त्यांनी कचरा वाहतूक करणारी वाहने थांबवित वाहन चालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना व इतर कागदपत्रांची मागणी केली. वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक कचरा का वाहून नेला जातो, अशी विचारणा केली. सदर वाहनांच्या चालकांनी कुठलीही समर्पक उत्तरे न दिल्याने आणि मागितलेल्या कागदपत्रांची पूर्तता न केल्याने ग्रामस्थांनी ही वाहने रोखून धरली.

ग्रामस्थ या नात्याने पाठिंबा
गेल्या काही दिवसांपासून या वाहनांमधून बाहेर उडणाऱ्या कचऱ्याचा त्रास ग्रामस्थांना होत आहे. त्याचबरोबर संगमनेर खुर्द येथील कचरा डेपोला आमचा विरोध असून तो लवकरात लवकर त्याठिकाणाहून हटवावा, सर्व ग्रामस्थांची मागणी आहे. संगमनेर खुर्दच्या कचरा डेपो हटाव कृती समितीला ग्रामस्थ या नात्याने पाठिंबा आहे.

विलास गुंजाळ, संगमनेर खुर्द ग्रामस्थ. 

शहरात संकलित झालेला कचरा वर्गीकरण करुन तो संगमनेर खुर्द येथील पालिकेच्या कचरा डेपोत टाकला जातो. कचरा संकलनाचा ठेका दिलेल्या कंपनीने कचऱ्याची वाहतूक करताना नियम व अटीचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, यात काही त्रुटी असल्यास चौकशी करून कारवाई करण्यात येईल.

डॉ. सचिन बांगर, मुख्याधिकारी.