Breaking News

आ. नितेश राणे व शिवसेनेचे विक्रांत सावंत कॅफेच्या उद्घाटनासाठी एकत्र


सिंधुदुर्ग, दि. 12, मे - राणे आणि शिवसेना यांच्यातली विळी भोपळ्याचे सख्य सगळ्यांनाच माहित आहे. मात्र सावंतवाडीत राजकीय चमत्कार पाहायला मिळाला. महाराष्ट्र स्वाभिमानचे युवा नेते आमदार नितेश राणे आणि शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष विक्रांत सावंत हे एका कॅफेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने एकत्र दिसून आले. कट्टर हाडवैर असलेल्या दोन पक्षातील हे युवा नेते केवळ एकत्रच आले नाही, तर कॅफेतील टेबलावर हास्यकल्लोळात त्यांच्यात गप्पांचा फड रंगला होता. हे दृश्य पाहून उपस्थित देखील चक्रावून गेले.

नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यापासून शिवसेना आणि राणे परिवारात हाडवैर आहे. शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी राणे सोडत नाहीत. तर शिवसेना देखील राणेंना खिंडीत पकडण्याचा वारंवार प्रयत्न करते. त्यात भर म्हणून राणेंनी काँग्रेस सोडल्यानंतर काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष विकास सावंत आणि नारायण राणे यांच्यात प्रचंड मतभेद निर्माण झाले होते. विकास सावंत यांचे सुपुत्र विक्रांत सावंत हे शिवसेनेचे पदाधिकारी असल्यावरून राणेंनी विकास सावंत यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे राणे परिवार आणि सावंत परिवारात दुश्मनी वाढली होती. या पार्श्‍वभूमीवर नितेश राणे आणि विक्रांत सावंत एकत्र दिसून आल्याने सिंधुदुर्गात नवीन राजकीय समीकरणे उदयाला येतायत कि काय, यावर राजकीय वर्तुळाच चर्चा रंगली आहे.