Breaking News

नवविवाहितेचे अपहरण करणारा गजाआड

सासर्‍याला चाकूचा धाक दाखवून नवविवाहितेचे अपहरण करणारा आरोपी अस्तिक डाडर यास पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने 9 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दि. 3 मे रोजी जामखेड बस स्टॅण्डवरून घडलेल्या घटनेमुळे जामखेडमध्ये खळबळ उडवून देणार्‍या घटनेतील आरोपीच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याविरुद्ध भादंवि 363, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता, पोलिस निरीक्षक पांडूरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना अजिनाथ बडे यांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या व न्यायालयात हजर केले असता, त्यास 9 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

तर दुसर्‍या प्रकरणात जामखेड - आपटी ही जामखेड बस स्टॅण्डवरून आपटीकडे जाताना आरोळेवस्तीवर आली, तेंव्हा बसमध्ये साठ प्रवाशी प्रवास करत होते. यावेळी तिकीट बुकिंग करणार्‍या बसवाहकाने एका प्रवाशास तिकीट काढले का असे विचारले असता, राग येऊन कंडक्टरची कॉलर पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाणीसह शिविगाळ केली. बस कंडक्टर संतोष आप्पासाहेब शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी दत्तात्रय गोरे यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली, व न्यायालयात हजर केले असता 9 मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.