Breaking News

वनतळे ऊरले फक्त नावालाच !

कडक उन्हामध्ये प्राण्यांच्या जिवाची काहील थांबण्यासाठी वनविभागाच्या वतीने भोयरे गांगर्डा, नारायणगव्हाण, वाडेगव्हाण, जातेगाव, पळवे या ठिकाणी वनतळे बांधण्यात आली. मात्र यात गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याचा थेंबही टाकला जात नसल्याने हरणांसह, अन्य प्राणी सैरावैरा झाले आहेत. हे प्राणी वस्तीच्या परिसरात किंवा नगर-पुणे महामार्ग लगत पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करताना दिसतात. परिणामी अनेक प्राण्यांना आपल्या जिवास मुकावे लागले आहे. सध्या उन्हाचा पारा 46 च्या वर चढला असून परिसरातील अनेक डोंगर जळून भस्मसात झाले आहेत. यात लाखो जीव मृत्यूमुखी पडले, तर हजारो झाडे जळून खाक झाले. हिरवा किंवा वाळलेला चारा उपलब्ध नसतांना पिण्याचे पाणी देखील मिळत नसल्यामुळे वन्यप्राणी जिवास मुकत असतांना वन विभागाने झोपेचे सोंग घेतले आहे, त्यामुळे वन्यप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.