Breaking News

विवाहसोहळ्यातून दिला ‘स्त्री जन्माचे स्वागत


श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी दुमाला येथील भाऊसाहेब शिंदे कुटुंबियांनी स्त्री भृणहत्येवर प्रकाशझोत टाकतांना विवाह सोहळ्यातून ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ असा सामाजिक संदेश दिला. पुणे जिल्ह्यातील इनामगाव येथे सुरेश भाऊसाहेब शिंदे ( हिंगणी, ता. श्रीगोंदा ) आणि सारिका अर्जुन डोमाळे ( वांगदरी, ता. श्रीगोंदा ) या नवदांपत्याचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. लग्नसोहळ्यातील सर्वच डामडौल आणि आवश्यक खर्चाला या विवाहसोहळ्यात फाटा देण्यात आला. 
लग्नसोहळा म्हटले, की नवरदेवाची वरात, त्यामध्ये होणारी फटाक्यांची अताषबाजी, डीजेचा कर्णकर्कश दणदणाट, पाहुण्यांचे सत्कार आणि अन्य अनावश्यक खर्च बाबींना विनाकारण महत्व आलेच. मात्र या सर्वांना फाटा देत पत्रकार दीपक वाघमारे आणि नवनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून देवदैठण येथील सुरभी बहुउद्देशिय संस्था, आणि हिंगणीच्या यशवंत प्रतिष्ठाच्या संयुक्त विद्यमाने हा अनोखा आणि आदर्श विवाह सोहळा पार पडला. यानिमित्त ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या उपक्रमांतर्गत ‘स्त्री जनांचे स्वागत’ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या प्रणेत्या डॉ. सुधा कांकरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी रासप महिला आघाडीच्या अध्यक्षा डॉ. उज्वला हाके, जि. प.च्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे, भाजपा अ. जिल्हा सरचिटणीस सुवर्णा पाचपुते, पं. स. सदस्या कल्याणी लोखंडे, अॅ ड. कमल सावंत आदी उपस्थित होत्या. 

यावेळी डॉ. कांकरिया यांनी ‘स्त्री जन्म स्वागता’च्या आठव्या फेऱ्याविषयी समजावून सांगितले. त्या म्हणाल्या, वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा या अट्टाहसापायी स्त्री भ्रूण हत्येचे वाढते प्रमाण चिंताजनक बाब आहे. त्यामुळे स्त्री भ्रूण हत्या थांबविण्यास मदत करा, स्त्री जन्माचे स्वागत मनापासून करा. यावेळी ‘कन्या जन्म आनंद’ सोहळयाने मुलीचे स्वागत करू, असा ग्रामसभेचा ठराव ग्रा. पं. सदस्य ज्ञानदेव शिंदे यांनी डॉ. कांकरिया यांच्याकडे सुपुर्द केला. या ठरावाचे वाचन भाजपा जिल्हा सरचिटणीस सुवर्णा पाचपुते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश अवचिते यांनी केले. गव्हाणेवाडी तंटामुक्तीचे अध्यक्ष संपत मोटे यांनी आभार मानले.