मुळानगरच्या रहिवाश्यांना घरे खाली करण्याच्या नोटिसा
राहुरी : मुळानगर येथील शासकीय निवासस्थानात गेल्या ५० पेक्षा जास्त वर्षांपासून राहत असलेल्या कुटुंबांना घरे खाली करण्यासंदर्भात नोटीस देण्यात आल्या. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. यासंदर्भात जिल्हाधिका-यांना भेटून मार्ग काढू, अशी ग्वाही जि. प. सदस्य शिवाजीराजे गाडे यांनी दिली.
मुळानगर येथे गेल्या अनेक वर्षांपासून ४०० पेक्षा जास्त कुटूंबे शासकीय निवासस्थानात राहत आहेत. यातील अनेक कुटूंबे धरणाचे काम सुरू झाल्यापासून येथे राहतात. तसेच कृषि विद्यापीठाचे कर्मचारीही अनेक वर्षे या ठिकाणी राहत होते. सध्या मुळा पाटबंधारे खात्यातील सेवानिवृत्त कर्मचारी, भूमिहीन, शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, मोलमजुरी करणारे कर्मचारी, मच्छिमार येथे राहत आहेत. या सर्वांपासून धरणाच्या सुरक्षिततेला कोणताही धोका नाही. मुळा धरण पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात. या पर्यटकांच्या आर्थिक देवाणघेवाणीतून या लोकांची उपजिविका चालते.
अनेक वेळा धरणात बुडालेल्या पर्यटकांना बाहेर काढुन कित्येकांचे प्राण या लोकांनी वाचविले आहेत. ज्यांनी धरण उभारणीत काम केले, ज्यांचे पर्यटकावर उपजिवीका चालते, ज्यांच्यापासून ५० वर्षांत धरणाच्या सुरक्षिततेला धोका पोहोचला नाही, पोहोचणार नाही. असे असतांना मुळा धरणाच्या सुरक्षिततेचे कारण देत या लोकांना विस्थापित करण्यात येऊ नये, असे सांगून यासंदर्भात लवकरच जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना भेटून मार्ग काढण्यात येईल, असे गाडे म्हणाले.