Breaking News

कोल्हार भगवतीपूरकर भक्तिरसात झाले तल्लीन!


कोल्हार : ह. भ. प. रामदास महाराज कैकाडी यांच्या अमृत वाणीतून होणा-या भागवत कथेत स्थानिक ग्रामस्थांचे देहभान हरपून गेले आहे. भक्तगण तल्लीन होऊन तुकाराम व विठ्ठल नामाच्या नावाच्या जयघोषात ठेका धरून भक्तिरसात चिंब झाल्याने परिसर दुमदुमला आहे. कोल्हार भगवतीपूरच्या पुण्यनगरीत सुरु असलेल्या पारायण व भागवत कथा सप्ताह सोहळ्यात येथील ग्रामस्थ भक्तिरसात चांगलेच तल्लीन झाले आहेत.
राहाता तालुक्यातील क्षेत्र कोल्हार भगवतीपूर येथे अधिक मासानिमित्त श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा व श्रीमद भागवत कथा ज्ञानभक्ती महोत्सवाला दि. १९ तारखेला भगवती मातेच्या मंदिराच्या भव्य प्रांगणात भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. रोज सकाळी पारायणास शेकडो महिला व पुरुष भक्त पारायण करीत आहेत. तर सायंकाळी विष्णू सहस्त्रनाम व हरिपाठ अन त्या पाठोपाठ रात्री ८ वाजता ह भ.प. रामदास कैकाडी उर्फ शिवराज महाराज जाधव यांच्या अमृत वाणीतून संगीतमय भागवत कथा ज्ञानभक्ती महोत्सव सुरु आहे. 

या सोहळ्यामुळे कोल्हार भगवतीपूरच्या पुण्यनगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. येत्या शुक्रवारी {दि. २५ } सायंकाळी संत तुकाराम गाथा भव्य मिरवणूक आणि त्यानंतर दिपवंदनाचा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी सकाळी १० वाजता सरला बेटचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने या ज्ञानभक्ती सोहळ्याची सांगता होईल.