प्लास्टिक बंदी होऊन महिना उलटला परंतु, अंमलबजावणी मात्र शून्य
पुणे : प्लास्टिकमुळे तुंबणारी गटारे, प्लास्टिक पोटात गेल्यामुळे जनावरांचा होणारा मृत्यू आणि पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी राज्य सरकारने प्लास्टिक बंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असला तरी प्लास्टिक बंदी होऊन महिना उलटला परंतु, अंमलबजावणी मात्र शून्य आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी केली आहे.बच्छाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शासनाकडून प्लास्टिक बंदी करण्यात आली परंतु महापालिकेच्या स्तरावर प्लास्टिक बंदी ही फक्त कागदोपत्रीच मर्यादित राहिली आहे. प्लास्टिकचा वापर करणा-यांवर कारवाई होत नसल्याने प्लास्टिक बंदी कायद्याचा धाक उरलेला नाही. त्यामुळे प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घालून देखील ती पूर्णपणे रोखण्यात जवळपास सर्वच महानगरपालिका प्रशासन अयशस्वी ठरले. कारण बंदी घालण्यापूर्वी पर्यायी उपाययोजना त्यांना शोधता आली नाही.आता पर्यावरणाचा नारा देत पालिका प्रशासन कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करा, प्लास्टिक पिशव्या वापरू नका असे सांगत आहेत. मात्र, महानगरपालिकेकडून मुळावर घाव घातला जात नाही. प्लास्टिकच्या उत्पादनालाच बंदी घातली तर प्लास्टिक बंदीचा प्रश्नच उद्भवणार नाही. मुळातच अशा पिशव्या उत्पादित करणे आणि वापरणे बेकायदा आहे. त्यामुळे आधी त्याच्या उत्पादनावर बंदी घालणे आवश्यक आहे. असे बच्छाव यांनी म्हटले आहे.