Breaking News

सलग तेराव्या दिवशीही पेट्रोल-डिझेल महाग

श्रीनगर : इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारवर टीका होत असताना आज सलग तेराव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल प्रतिलिटर 13 पैसे तर डिझेल प्रतिलिटर 16 पैशांनी महागलं आहे. मुंबईत शनिवारी पेट्रोल 85 रुपये 78 पैशांनी मिळत आहे. तर डिझेलचे दर 73 रुपये 34 पैसे आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर 77 रुपये 96 पैशांवर पोहोचला आहे.पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे देशात ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत. परंतु दरांवर नियंत्रण आणण्यात सरकारला आतापर्यंत यश आलेलं नाही.

दुसरीकडे देशात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल महाराष्ट्रात आहे. अधिक स्पष्ट करायचं झालं तर अमरावतीत देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल आहे.अमरावतीतील पेट्रोलच्या दराने 87 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. अमरावतीमध्ये आजचा दर 87.11 रुपये तर डिझेल 74.79 रुपये आहे.
डिझेल आणि पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतीमुळे मुंबई माल वाहतूक टेम्पो महासंघांकडून भाडेवाढ करण्यात आली आहे. महासंघाच्या बैठकीत 20 टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. गाड्यांच्या भाड्यात वाढ झाल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीही 25 ते 30 टक्क्यांनी वाढणार असल्यास दिसतं आहे. वाशी एपीएमसीमधून भाजीपाला, फळ, कांदा बटाटा, अन्नधान्य आणि मसाला मार्केट मधून माल मुंबई, उपनगर, ठाणे, वसई - विरार ला पोहचवला जातो. 20 टक्के भाडेवाढ झाल्याने याचा फटका ग्राहकांना बसणार. मुंबईत भाडेवाढ करण्यात आल्यानंतर काही दिवसात महाराष्ट्र मधील मालवाहतूकीतही भाडेवाढ होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.