‘अळीचे भुंगेरे’ नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत : तांबे
लोणी : मागील हंगामात प्रवरा परिसरातील काही भागात ऊस पिकावर हुमणी अळीचा पादुर्भाव झाला होता. त्याच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाला. अळी आल्यानंतर उपचाराचा फारसा उपयोग होत नाही. पर्यायाने अळीचे भुंगेरे अवस्थेपासूनच उत्पादकांनी एकजुटीने नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास तांबे यांनी केले.
चिंचपूर (ता. संगमनेर) येथे कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर आत्मा अहमदनगर आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखाना प्रवरानगर यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित हुमणी अळीच्या शेतकरी प्रशिक्षणात ते बोलत होते. प्रारंभी केंद्राचे पीक संरक्षण शास्त्रज्ञ भरत दंवगे यांनी किडीचा जीवनक्रम विषद केला. ते म्हणाले, यामध्ये भुंगेरे ही अवस्था घातक आहे. नर आणि मादी भुंगेरेचे मिलन रोखले तर पुढील अळीची उत्पत्ती होणार नाही, याचा फायदा ऊसाच्या बेटाचे संरक्षण होण्यावर होईल. कार्यक्रमात शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन दवंगे यांनी केले. याप्रसंगी केंद्राचे विस्तार शास्त्रज्ञ सुनील बोरुडे, कृषी विद्या विभागाचे प्रमुख शैलेश देशमुख यांनी मार्गदर्शन केले. शेवटी कृषी सहाय्यक वाकचौरे यांनी आभार मानले.