अनुदानाच्या रकमेला नेमका अडसर कोणाचा?
शेवगाव : शासकीय अनुदानासाठी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरील जमा होणाऱ्या रकमेला नेमका कोणाचा अडसर ठरतोय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून तालुक्यातील निवड पद्धतीने संबंधित लाभार्थ्यांची निवड केली जाते.
यावर्षीच नव्याने सुरू करण्यात आलेली ही प्रक्रिया पूर्णतः अपयशी ठरली आहे. तालुक्यातील दूध उत्पादक व आदर्श पालक आदर्श गोपालक शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना केल्या जाणाऱ्या विविध वस्तूंचे वाटप संदर्भातील रक्कम नेमकी प्रशासकीय अधिकारी व राजकीय पुढारी यापैकी नेमका अडथळा कोणाचा, या प्रश्नाचे उत्तर मात्र सापडायला तयार नाही. दोनच दिवसांमध्ये बँक खात्यामध्ये रक्कम जमा होईल, अशी गोड स्वप्ने दाखवून अधिकाऱ्यांनी शासकीय कामकाज पूर्ण करून घेतले. शेतकऱ्यांच्या खिशातील शेतीच्या नियोजनासाठी ठेवलेले पैसे लाभार्थ्यांनी या वस्तूंमध्ये गुंतवून गुन्हा केला आहे की काय, दोन महिने होत आहेत.परंतु अद्यापही अनुदान रकमेच घोड नेमकं कुठे अडलंय, अशी विचारणाग्रामीण भागातून केली जात आहे.
जूनपूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा व्हावी, जेणेकरून त्यांना शेतीच्या पूर्वमशागतीस लागणाऱ्या खते व बी-बियाणेसाठी त्याचा वापर करता येईल. अन्यथा संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक बाबींना तोंड द्यावे लागेल. भविष्यातील निर्णायक गोष्टीकडे लक्ष ठेवून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित रक्कम जमा करावी. अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणा या दुफळीमध्ये शेतकऱ्यांना विनाकारण भरडू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न
चालू वर्षी नव्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्यामार्फत वाटप करण्यात आलेल्या वस्तूंच्या संदर्भातील कुठल्याही प्रकारची फाईल माझ्यासमोर आलेली नाही. त्यामुळे त्यासंदर्भात मी बोलणे उचित ठरणार नाही. तुमच्या सांगण्यावरून मला पहिल्यांदा या विषयाची कल्पना मिळाली आहे. मिळालेल्या माहितीवरून मी लवकरात लवकर निर्णय घेऊन संबंधित शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू.
अशोक भवरी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती.
धोंड्याच्या गोड जेवणासाठीची केली रक्कम
शेवगाव पंचायत समितीकडून पत्र प्राप्त झाले. लाभार्थीं निवडीमध्ये नाव आल्याचे कळल्यानंतर आनंदही वाटला. परंतु यावर्षी अधिक मास महिना असल्याने धोंड्याच्या गोड जेवणासाठी ठेवलेली रक्कम शासकीय कार्यालयात जमा करून अनुदानाची वाट पाहण्याची वेळ आली आहे. आता नेमके काय करावे, असा प्रश्न आमच्या कुटुंबाला पडला आहे.
लाभार्थी, महिला शेवगाव तालुका.