Breaking News

वन्य पशुपक्षांना चक्क टँकरद्वारे पिण्याचे पाणी; राजमुद्रा प्रतिष्ठानचा पुढाकार


संगमनेर : जगद्गगुरु संत तुकाराम महाराज यांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या अभंगाप्रमाणे वन्य पशुपक्षांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध द्यावी, हा आदर्श येथील युवकांनी नव्या पिढीला घालून दिला आहे. जंगलातील हे जीव उन्हाळ्यात पाण्यावाचून कासावीस होऊ नयेत, यासाठी या युवकांनी केलेली ही सुविधा प्रेरणादायी असून मालदाडच्या राजमुद्रा प्रतिष्ठानने यासाठी पुढाकार घेतला आहे. 
तालुक्यातील मालदाड, सोनाशी, सुकेवाडी या जंगल परिसरातील वन्य प्राणी, पशु, पक्षी आदींची उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याअभावी प्रचंड गैरसोय होते. उन्हाळयात तहान भागविण्यासाठी हे पशुपक्षी पाण्यासाठी सैरावैरा पळत असतात. माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मालदाड गावातील राजमुद्रा प्रतिष्ठानच्यावतीने जंगलामध्ये पिण्याच्या पाण्याच्या टँकरद्वारे पुरवठा करण्यात आला. राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ झाला. 

यावेळी माजी जि. प. सदस्य भाऊसाहेब नवले, माजी पं. स. सभापती रावसाहेब नवले, राजहंस दूध संघाचे उपाध्यक्ष साहेबराव गडाख, अमृतवाहिनी बँकेचे संचालक कचरु फड, राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश नवले, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजय नवले, जालिंदर नवले, भाऊसाहेब नवले, भिमराज नवले, मच्छिंद्र नवले, शिवनाथ नवले, विलास नवले, उत्तम नवले, गोरख नवले, मच्छिंद्र नवले, राजू नवले, अरुण नवले, गवराम नवले, बाजीराव नवले, वनविभागाचे कर्मचारी शिंदे, कानवडे, ढवळे आदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, पशुपक्षी ही सृष्टीची खरी संपत्ती आहे. मानवांसाठी ते मोठे वैभव आहे. मानवाने सुरुवातीपासूनच पक्षांवर खूप प्रेम केले आहे. परंतू वाढती उष्णता व दुष्काळ यामुळे पक्षांचे स्थलांतर होत आहे. मात्र यासाठी राजमुद्रा प्रतिष्ठानने राबविलेला हा उपक्रम स्तृत्य आहे. प्रतिष्ठानचा हा आदर्श घेत प्रत्येकाने आपल्या घरासमोर पक्षांसाठी पाण्याची सोय करावी. वन्यपक्षी व प्राण्यांसाठी हा अभिनव उपक्रम इतरांसाठी सातत्याने दिशादर्शक ठरणारा आहे.