जळितग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत
राहुरी : येथील शेटेवाड़ी परिसरातील दोन घरांना आग लागून लाखो रूपयांचे नुकसान झाले. या जळित कुटुंबांना येथील चैतन्य उद्योग समुहाचे गणेश भांड आणि साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी तातडीची आर्थिक मदत केली.
शेटेवाडी येथे अशोक जंगले यांचे छपराचे घर आहे. मंगळवारी पहाटे जंगले यांच्या घराला आग लागली. आगीमुळे घरातील किराणा साहित्य, संसारोपयोगी वस्तू सर्व जळून खाक झाले. या घटनेत जंगले यांच्या घरातील सुमारे अडीच लाख रूपयांचे नुकसान झाले. तर शेजारी असलेल्या सुखदेव रघुनाथ नरसाळे यांच्याही घराला आग लागल्याने त्यांच्याही स्वयंपाक घरातील साहित्य जळून खाक झाले.
नरसाळे यांचे ५० हजार रूपयांचे नुकसान झाले. दोन्हीही कुटुंब मोलमजूरी करुन गुजराण करणारे आहे. या घटनेमुळे मनोधैर्य खचलेल्या या कुटुंबांना आर्थिक मदत देऊन उभारी देण्याचे आदर्श कार्य चैतन्य उद्योग समूह आणि साई आदर्श मल्टीस्टेट या संस्थांनी केले.