Breaking News

खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता


कोपरगाव श. प्रतिनिधी - तालुक्यातील खोपडी येथील विलास दशरथ गायकवाड याने धोत्रे येथील विवाहितेशी काही दिवसांपूर्वी प्रेमसंबंध जुळवून तिला पळून नेलेले होते. या रागातून या महिलेच्या काळू दगू सोनवणे या मुलाने विलास गायकवाड याचा खून केला होता. दरम्यान, या खून खटल्याचा नुकताच निकाल लागला असून न्यायालयाने सोनवणे याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. खूनाच्या या घटनेपूर्वी आरोपी गायकवाड याचा चुलतभाऊ राजेश गोरक्षनाथ गायकवाड यास म्हणाला की, तुझ्या चुलत भावाने माझ्या आईला पळवून नेऊन आम्हाला पोरके केले आहे. त्यामुळे तो मला एकटा भेटल्यावर मी त्याचा काटा काढील व बदला घेईल. 

काही दिवसानंतर मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात {दि. २० } सकाळी आठच्या सुमारास विलास गायकवाड याचा खोपडीफाटा येथे मृतदेह आढळून आला. यावरून कोपरगाव पोलिसांनी मयताचा चुलत भाऊ राजेश गायकवाड याच्या फिर्यादीवरून भा. द. वि. कलम ३०२ प्रमाणे काळू दगु सोनवणे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची नुकतीच सुनावणी झाली. त्यात अँड. निलेश कातकडे यांनी आरोपीची बाजू मांडतांना सदर घटनेला कुठल्याही प्रकारचा प्रत्यक्ष साक्षीदार नसून फक्त संशयाच्या आधारे आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे न्यायालयाच्या न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सरकारी पक्षातर्फे पंच आणि तपासी अधिकारी यांच्या साक्ष घेण्यात आल्या. परंतु न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी काळू दगू सोनवणे याची दि. २४ एप्रिल रोजी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अँड. निलेश कातकडे यांनी कामकाज पाहिले.