मळीच्या टँकरवर कार आदळून भीषण अपघात, तिघांचा मृत्यू
सोलापूर, दि. 3, मे - रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मळीच्या टँकरवर कार आदळून झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. ते पुण्याचे रहिवासी असल्याचे समजते. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभूर्णी कुर्डूवाडी मार्गावर पिंपळनेर गावाच्या हद्दीत रंगोले ढाब्याजवळ हा अपघात झाला.संजय माधवराव चव्हाण (रा. अंबेगाव, पुणे), अरुण माधव हडके (रा.अंबेगाव, पुणे), महावीर सुभाष पगारिया (रा.पुणे) अशी मृतांची नावे आहेत. रंगोले ढाब्याजवळ मळीने भरलेला टॅकर (एमएच12-आरए- 947 ) उभा होता. या टँकरला टेंभूर्णीहुन कुर्डूवाडीच्या दिशेने चाललेली कार (क्र (एमएच -12 एचएक्स-9369) मागून आदळली. अपघात एवढा भीषण आहे की, कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघाताची नोंद कुर्डूवाडी पोलिसात करण्यात आली आहे. पोलिसात अज्ञात टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.रिप्लेक्टर लावले नसल्याने अनेकांचे बळी कारवाईकडे आरटीओचे दुर्लक्ष-वाहतुकीचे नियम अनेकजण पायदळी तुडवत आहेत. वाहतूक करणार्या वाहनांना रिप्लेक्टर लावणे बंधनकारक आहे. मात्र अनेक वाहनांना हे रिप्लेक्टर लावले जात नाही. यामुळेच असे निष्पाप जीव जात आहेत. ऊस वाहतूक करणारे टॅक्टर, ट्रकला रिप्लेक्टर लावलेले नसते, अशी वाहने रस्त्याच्या कडेला उभी करुन वाहनचालक हॉटेल-पानटपरीवर थांबतात, अशा रिप्लेक्टर नसलेल्या वाहनांना मागून येणारी वाहने धडकतात आणि निष्पाप जीव जातात. आणखी किती जणांचे मृत्यूची वाट आरटीओ विभाग पाहणार असल्याचा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.