Breaking News

नव्या नियमानुसार अंतिम मतदारयादी जाहीर


सोलापूर, दि. 17, मे - नव्या नियमानुसार अंतिम मतदारयादी जाहीर केली असून यामध्ये प्रथमच सोलापूर बाजार समितीसाठी 1 लाख 16 हजार 625 व बार्शी बाजार समितीसाठी 1 लाख 4 हजार 477 शेतकरी बाजार समितीचे संचालक निवडतील. विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन, संचालक व ग्रामपंचायत सरपंच व सदस्य हे बाजार समितीचे संचालक निवडत, पण राज्य सरकारने कायद्यात बदल करून 10 गुंठेपेक्षा अधिक शेतजमीन असलेल्या शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार दिल्याने मतदार वाढले आहेत. 
जून महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे. प्राधिकरणची निवडणूक कार्यक्रमास मंजुरी मिळताच निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांनी दिली. सोलापूर बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया जूनमध्येच पूर्ण केली जाणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून प्राधिक रणाला सादर करण्यात येईल. प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर जूनमध्ये निवडणुकीची सर्व प्रक्रिया मार्गी लागेल. 

सोलापूर व बार्शी बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाल पूर्ण होऊन दोन वर्षे झाली तरी निवडणूक घेतली जात नसल्याचा आरोप लोकप्रतिनिधी करत होते. मतदारांच्या निकषात वेळोवेळी बदल करत निर्णय देण्यात आल्याने मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया रखडली होती. निवडणूक प्रक्रिया मुदतीत होण्यासाठी न्यायालयात याचिकाही दाखल झाल्या होत्या.