Breaking News

नोकरीच्या आमिषाने तरुणाला ३ लाखांना फसविले! शिर्डी पोलिसांनी घेतली दखल


शिर्डी प्रतिनिधी - पुणे येथील नामंकित शैक्षणिक संस्थेत शिक्षकाची नोकरी देतो, असे आमिष दाखवून सांगुन संबधीत उमेदवाराकडून तीन लाख रूपये घेऊन त्याला बनावट नियुक्तीपत्र दिले. याप्रकरणी प्रसिध्दी माध्यमाशी संबंधित असलेला डॉ. राजेश उर्फ राजकुमार जगन्नाथ जाधव {रा. श्रीरामनगर, शिर्डी} याच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या तक्रारीनुसार पोलिसांनी जाधवविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. 

दरम्यान, सदर तरुण नियुक्तीपत्र घेऊन संबंधित संस्थेकडे नोकरीसाठी गेला. मात्र हे नियुक्तीपत्र बोगस असून सदर व्यक्तीचा या संस्थेशी कुठलाही संबध नाही, असा खुलासा माहिती संस्थेच्या प्राचार्यांनी केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असल्याची माहिती पो. नि. प्रताप इंगळे यांनी दिली. कोपरगावच्या घारी येथील संजय कर्णा जाधव हा तरूण एमएबीएड आहे. वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या जाहिरातीवरून तो पुणे जिल्ह्यातील स्वामी समर्थ डीएड कॉलेजच्या कार्यालयात {मेदनकरवाडी, पो. चाकण, ता. खेड, जि. पुणे} मुलाखतीसाठी गेला. त्यानंतर शिर्डी येथील डॉ. राजकुमार जाधव याने संजय जाधव यांच्याशी संपर्क करून ‘तुला नोकरी मिळून जाईल. त्यासाठी ३ लाख रूपये द्यावे लागतील. ही संस्था मी घेतली आहे. तू ३ लाख रूपये दे. तुला नियुक्तीपत्र देतो’, असे आमिष दाखविले. घरच्यांशी विचारविनिमय करून निर्णय घेतो, असे जाधव याने सांगितले. नोकरीची गरज असल्याने आणि ‘गरजवंताला अक्कल नसते’ या सुभाषिताप्रमाणे दुसर्‍या दिवशी घरी चर्चा करून मामा भिमराज एकनाथ पवार व राम पवार यांच्या समवेत संजय जाधव हा राजकुमार जाधव यांच्या शिर्डी येथील साईनाथ हॉस्पिटल जवळील कार्यालयात गेला. दि. १५ सप्टेबर २०११ रोजी त्याने जाधव यांना ३ लाख रूपये दिले. त्यानंतर भारतमाता सोशल फाऊंडेशन, श्रीरामनगर, शिर्डी या संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश जाधव यांनी नियुक्तीपत्र दिल्याचे संजय जाधव याने पोलिसांना सांगितले. 

… इतरांसाठी फसवणूक होऊ नये यासाठी!

नोकरीच्या आमिषाने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. परंतु खूप उशीर झालेला होता. मात्र नोकरीची आशा सोडून जाधव यांना मी दिलेले ३ लाख रुपये मागितले असता ‘माझ्या घरी येऊन त्रास दिल्यास मी पत्नीला सांगून तुमच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार देऊन तुम्हाला ‘आत’ टाकील. दिलेले पैसे विसरून जा, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरून त्याच्याकडे पुन्हा गेलो नाही. माझ्यासारख्या अनेकांना जाधव याने फसविले आहे. अजूनही तो अनेकांची फसवणूक करत आहे. ती होऊ नये, यासाठी मी शिर्डी पोलिस ठाण्यात जाधव याच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.

संजय जाधव, कोपरगाव.