Breaking News

पिसाळलेल्या कुत्र्याचा ६ जणांना चावा


आश्वी : प्रतिनिधी - संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक व परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने गुरुवारी {दि.२४ } पहाटेपासून अनेकांना चावा घेऊन जखमी केले. यातील सहा जणांवर प्राथमिक उपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. 

आश्वी बुद्रुक येथील बाजारतळ परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने चांगलाच धुमाकूळ घातला. यात येथील नानासाहेब खेमनर, चाऊ मिस्तरी, सानिका देहरे, केशव उदावंत, लहानू बर्डे यांना चावा घेत जखमी केले. दरम्यान, रमेश कुऱ्हाडे व शीला बर्डे हे दोघे जण या कुत्र्याच्या हल्यातून थोडक्यात बचावले. अचानकपणे कुत्रा हल्ला करत असून येथील अनेक तरुण लाठ्या-काठ्या बरोबर घेऊन या कुत्र्याचा शोध घेत आहेत. मात्र सदर कुत्रे सापडत नसल्याने लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, मागील अनेक महिन्यांपासून आश्वी परिसरात बाहेरुन आणून सोडण्यात आलेल्या भटक्या कुत्र्यांचा मोठाच सुळसुळाट झाला आहे. प्रतापपूर रस्ता, मांची रस्ता, आश्वी बुद्रुक बाजारतळावरील विठ्ठल मंदिर पटांगण आदी ठिकाणी या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. त्यामुळे दुचाकी व पायी प्रवास करणाऱ्या नागरिकांना लहान-मोठ्या अपघाताचा सामना करावा लागत आहे. उंबरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला आश्वी बुद्रुक येथील सर्व कचरा, मटन व चिकनच्या दुकानातील घाण टाकली जात आहे. त्यामुळे येथे नेहमी १५ ते २० कुत्र्यांचा त्रास येथील नागरिक व प्रवाशांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीने बंदोबस्त करत या कुत्र्यांच्या दहशतीतून नागरिकांची सुटका करावी, अशी मागणी सूज्ञ नागरिकांनी केली आहे.