Breaking News

प्रस्थापितांनी तालुका विकासापासून वंचित ठेवला : अ‍ॅड .काकडे

शेवगाव प्रतिनिधी. दि.22 - तालुक्यातील प्रस्थापितांनी तालुका विकासापासून वंचित ठेवला आहे. सर्व सामान्य माणसाला या तालुक्यात वालीच राहिला नाही. तालुक्यातून विकास हरवला आहे. असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. शिवाजीराव काकडे यांनी केले. मौजे सालवडगाव येथील पाझर तलाव दुरुस्तीच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक कुंडलिक टेकाळेे होते. या पाझर तलाव दुरुस्तीसाठी शासनाने 22 लाख रुपये निधी मंजूर केला आहे. यावेळी जि.प.सदस्या हर्षदा काकडे, जगन्नाथ गावडे, देवराव दारकुंडे, भिवसेन औटी, नितीन भापकर, मच्छिद्र टेकाळे, चंद्रभान कमानदार, शिवाजीराव औटी, भिवसेन गिरमकर, नारायण टेकाळे, अशोक निक्ते आदि मोठ्या संखेने उपस्थित होते. याप्रसंगी अ‍ॅड. काकडे म्हणाले की, तालुक्यातील विकास थांबला आहे. जो तो प्रस्थापित स्वतःचे राजकारण पाहात आहेत. माझ्यासारख्या तालुक्यातील भूमिपुत्राला बाजूला टाकण्याचे प्रयत्न होत आहेत. हा पुढे आला नाही पाहिजे यासाठी सर्व सत्ता मला रोखण्यासाठी एक होतात. मी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्‍नासाठी बांधील आहे. माझा गोरगरीबांसाठीचा लढा चालूच राहणार आहे. शेतकर्‍यांना पाणी हा महत्वाचा घटक आहे. पाण्यासाठी गावाने एक झाले पाहिजे. हा पाझर तलाव या गावाचे स्वरूप बदलू शकतो. त्यासाठी हा निधी आणला आहे. आता त्यासाठी चांगल्याप्रतीचे काम करून घ्या असेही ते म्हणाले. जि.प. सदस्या हर्षदाताई काकडे म्हणाल्या की काम मंजूर करण्यासाठी खूप चढा-ओढ असते. खूप प्रयत्न करून आपल्या कामाला यश आले आहे. कमिशन फंडा आमच्याकडे नाही देवाने आम्हाला भरपूर दिले आहे. त्यामुळे हे काम करतांनी गावकर्‍यांनी डोळ्यात तेल घालून चांगले क्वालीटिचे करून घ्यावे. कारण परत-परत निधी मिळत नसतो. याचा फायदा करून घ्यावा असेही काकडे म्हणाल्या. या प्रसंगी जगन्नाथ गावडे यांचेही भाषण झाले. कार्यक्रमास पत्रकार उमेश घेवरीकर, एकनाथ भापकर, तुळशीराम रुईकर, योगेश नेमाने, काशिनाथ रुईकर, शेषराव टेकाळे, बप्पासाहेब औटी, दादासाहेब भापकर, बन्सी मगर आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबासाहेब भापकर यांनी तर आभार रघुनाथ गिरमकर यांनी मानले.