Breaking News

चारा टंचाईने मेंढीपालन व्यवसायाला घरघर वाळलेल्या गवताची एकएक काडी पोटात ढकलत गुजराण

कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी, वायसेवाडी, करमणवाडी, गणेशवाडी, ताजु, पावणेवाडी, जलालपूर आदी गावातील लोकांचा मेंढीपालन हा प्रमुख व्यवसाय आहे, मात्र दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या कर्जत तालुक्यात चार्‍याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने वाळलेल्या गवताची एकएक काडी पोटात ढकलत शेळ्या मेंढयांची होरपळ सुरू आहे. त्यामुळे येथील मेंढीपालन व्यवसाय धोक्यात आला असून मेंढीपालन व्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

तालुक्याच्या पश्‍चिम भागातील गावे उजाड माळरानावर वसलेली आहेत. यातील बहुतांश गावे भटक्या विमुक्त समाजाच्या लोकवस्तीची आहेत. पारंपारिक पद्धतीने चालत आलेला मेंढीपालन हा प्रमुख व्यवसाय येथील लोक करत आहेत. एक-दोन एकराच्या जिरायत जमिनीवर उदरनिर्वाह होत नसल्याने येथील लोक मेंढीपालन व्यवसायास प्राधान्य देतात व पशुधनाचे मोठ्या कष्टाने संगोपन करून अर्थार्जन करतात. परिसरातील पडीक जमिनीवर चराई करून हा मेंढीपालन व्यवसाय चालतो. मात्र सध्या पाणी व चार्‍याचा टंचाईमुळे पशुधनाचे संगोपन करणे, त्यांचेसाठी जिकरीचे झाले आहे.चार्‍याच्या उपलब्धतेसाठी कोणताही मार्ग शिल्लक नसल्याने मेंढपाळ याच माळरानावर शेळ्या मेंढयांबरोबर भटकंती करत आहेत. गर्भधारीत मेंढ्यांची यात मोठी फरपट होत असून, गर्भधारणेचा कालावधी पूर्ण होण्याआधीच कोकरांना जन्म दिला जात असून त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

शासकीय योजनांचा लाभ नाही
मेंढपाळांबरोबर त्यांच्या लहान बालकांचीही भटकंती होत असल्याने त्यांच्या शिक्षण, आरोग्य व एकंदरीत भविष्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. राज्य सरकारने मेंढीपालन व्यवसायिकांसाठी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी शेळी-मेंढी विकास महामंडळाची स्थापना केली असली, तरी अद्यापही कित्येक मेंढीपाळांना त्याचा लाभ झालेला दिसत नाही. भटक्या विमुक्त समाजाच्या विकासासाठी मेंढीपालन व्यवसायिकांना कर्जवाटप, मोफत लसीकरण, मुलांसाठी आश्रमशाळा अशी उद्दिष्टे असली तरी, त्याचा लाभ होत नसल्याचे चित्र पहावयास मिळते.