Breaking News

अकोलेत वेडं मन तुझ्यासाठी चित्रपटाचे चित्रीकरण


अकोले / प्रतिनिधी 
निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आदिवासी अकोले तालुक्यात ’वेडं मन तुझ्यासाठी, या चित्रपटाचे अंतिम टप्प्यातील चित्रीकरण देवगाव, खिरविरे, एकदरे, म्हैसवळण घाट परिसरात सुरू आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करू लागले आहे.
विजय घोटे दिग्दर्शित वेडं मन तुझ्यासाठी हा चित्रपट सप्टेंबर महिन्यात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या शीर्षकगीताचे चित्रीकरण आढळा खोर्‍यातील अनेक गावांच्या घाटांमध्ये पार पडले. ऊन, वारा, पाऊस, धुके या निसर्गाच्या अद्भूत किमयाच्या साथीने गाण्याचे चित्रीकरण यशस्वी पार पडले.निसर्ग सौंदर्याने नटलेल्या अकोले तालुक्याची भूरळ पर्यटकांना नेहमीच पडत आली आहे. तसेच या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद आता अनेक चित्रपटाचे दिग्दर्शक देखील आपल्या कॅमेर्‍यात टिपू लागले आहे. त्यामुळे अकोले तालुक्याच्या सौंदर्याची किमया देशात नव्हे तर, परदेशातही आता अनुभवली जाणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक विजय घोटे हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील आहे. आपल्या चित्रपटातून अकोले तालुक्याचे सौंदर्य जगासमोर आणण्याचा घोटे यांनी एक छोटासा प्रयत्न केला आहे. रविवारी झालेल्या या चित्रिकरणात चित्रपटाची नवोदित अभिनेत्री कांचन तांडेल, चित्रपटाचा नायक राजेश गायकवाड यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. यावेळी अमोल शिर्के, संदीप दराडे, सचिन लगड आदींनी चित्रिकरणस्थळी भेट देवून दिग्दर्शक विजय घोटे यांच्याशी संवाद साधला. या चित्रपटाच्या गाण्याचे चित्रीकरण पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.