Breaking News

स्मार्ट सिटीच्या कामामुळे दूध बाजार परत एकदा विस्थापित


सोलापूर, दि. 17, मे - हरिभाई देवकरण प्रशालेसमोरील रस्त्यावर चालू असलेल्या स्मार्ट सिटी योजनेतील कामामुळे शहरातील दूध बाजार परत एकदा विस्थापित झाला आहे. अगोदरच दर घसरणीमुळे वैतागलेल्या दूध उत्पादकांना दूध विक्रीसाठी तप्त उन्हाचे चटके सोसत होम मैदानावर उभारण्याची वेळ आली आहे. दूध उत्पादक, विक्रेत्यांच्या संघटनअभावी याची दखल घेतली जात नाही आणि संबंधितांना स्वत: पुढे होऊन हा प्रश्‍न सोडवण्यात रस नाही. 
सोलापूर शहर व हद्दवाढ भागात मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय चालतो. पूर्वी येथील उत्पादकच शहराची ताज्या दुधाची गरज भागवत होता. पण वाहतुकीची साधने उपलब्ध झाल्याने शहरापासून दूरवरच्या ठिकाणाहून ताजे दूध सोलापूर शहरात विक्रीसाठी येते. 

पूर्वी आजोबा गणपतीजवळील बोळात दुधाचा बाजार भरला जात होता. त्याला दीडशे वर्षाचा इतिहास होता. परंतु हा बाजार स्थानिकांनी वाहनाचा त्रास होत असल्याचे सांगत बंद पडला. त्यामुळे विक्रेत्यांनी हरिभाई देवकरण प्रशालेसमोरील झाडाचा आसरा घेतला. येथेही त्यांना त्रास सोसावा लागत आहे. गड्डा यात्रा कालावधीत दूध विक्रीसाठी जागाच नसते. त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी उभे राहून दूध विक्री करावी लागते. अशा वेळी खरेदीदार विक्रेत्याची अडचण पाहून कमी दरात दुधाची मागणी करतात. 

सध्या सोलापूर शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याची कामे चालू आहेत. हरिभाई देवकरण प्रशालेसमोरील रस्त्यावरही काम चालू आहे. त्यामुळे तेथील झाडाखालील बाजार बंद केला आहे. त्यामुळे सध्या दूध बाजार जिल्हा परिषद आवाराच्या बाजूच्या आपत्कालीन रस्त्यावर भरला जात आहे.