Breaking News

‘त्या’ शाळांना शासनाने नाकारली परवानगी


।संगमनेर/प्रतिनिधी।

तालुक्यातील दोन इंग्रजी माध्यमाच्या शाळांना शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने परवानगी नाकारली आहे, अशी माहिती संगमनेर पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी साईलता सामलेटी यांनी दिली. 

संगमनेर तालुक्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होत चालला आहे. जिल्हा परिषदेने आता मराठी माध्यमाच्या शाळांचा दर्जा सुधारविण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सेमी इंग्लिश हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. गावागावात प्लेक्सबोर्डद्वारे व दवंडीद्वारे जनजागृती करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे मराठी माध्यमांच्या शाळांना पुन्हा चांगले दिवस येऊ लागले आहेत.

संगमनेर तालुक्यात २६ इंग्रजी माध्यमाच्या शाळांना शासनाने परवानगी दिली आहे. मात्र तालुक्यातील कुरण येथील इंदिरा इंटरनॅशनल इंग्लिश मेडीयम स्कुल तसेच चिंचोली गुरव येथील दि बुद्धिष्ठ सोसायटी इंग्लिश मेडीयम स्कुल या दोन इंग्रजी माध्यमाच्या शाळांना शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने परवानगी नाकारली. त्यामुळे या दोन्ही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन गटशिक्षण अधिकारी साईलता सामलेटी यांनी केले आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना आदेश 

चालू वर्षी तालुक्यातील ४ हजार ५०० विध्यार्थी पहिलीसाठी पात्र आहेत. त्यातील १ हजार १६५ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया मार्च अखेर पूर्ण झाली. इंग्रजी माध्यमाकडे वळलेल्या विद्यार्थ्यांपैकी किमान एक विद्यार्थी प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकाने आपल्या शाळेत आणावा, असे आदेश देण्यात येणार आहेत.

साईलता सामलेटी, गटशिक्षण अधिकारी.