Breaking News

बहुजननामा - मुलं नालायक तर, महापुरूष बापही नालायक ठरतो!


बहुजनांनो!

जन्मदात्या आईचा खून करणारा, क्षत्रियांची 21 वेळा कत्तल करणारा, व पोटाशी असलेल्या आयांचा व अर्भकांचा भाला खुपसून हत्त्या करणारा महापापी परशूरामाची जयंती परवा देशभर साजरी झाली! इतका क्रूर व रानटी असणारा माणूस ‘महापुरूष कसा? उत्तर सिम्पल आहे. या महापाप्याची लेकरं सतर्क व जागृत असल्याने ते आज सर्वंकष सत्ताधारी झालेले आहेत. त्यामुळे बापाला ते महापुरूषाचा दर्जा देत आहेत, त्याची जयंती साजरी करीत आहेत. तात्यासाहेब महात्मा फुलेंनी दीन, दलित, शूद्र जनतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी क्रूर परशुरामाच्या पोरांशी संघर्ष केला. जीव धोक्यात घातला. संपूर्ण आयुष्य झिजविले त्या तात्यासाहेबांना अजूनही अंधारातच खितपत पडावे लागते आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तात्यासाहेबांचे शिष्य! शिष्याला ‘भारतरत्न’ मिळतो. गुरूला नाही. कारण सिम्पल! बाबासाहेबांची लेकरं सतर्क व जागृत आहेत व तात्यासाहेब महात्मा फुलेंची लेकरं नालायक ठरली आहेत. मुलं नालायक निघालीत तर महापुरूष असलेल्या बापाची किंमत शून्य होते.
हेच वास्तव मी गेल्या आठवड्यातील बहुजननामाच्या सदरात ‘’माळ्यांनो! षंढ झाला आहात काय?’’ या शिर्षकाखाली लिहिले. वाटले होते खूप शिव्या मिळतील. पण नाही. एक प्राध्यापक व दुसरी प्राध्यापिका हे दोन बुद्मान(?) अपवाद वगळलेत तर हा लेख सर्वांनाच आवडला.रविवारी सकाळपासूनच फोन यायला लागलेत. माळी समाजातील व इतरही समाजातील कार्यकर्ते व वाचकांनी मनमोकळेपणाने चर्चा केली.व्हाट्सपवर व फेसबुकवर अनेकांनी हा लेख व्हायरल करून सविस्तर चर्चा घडवून आणल्यात.

काही प्रतिक्रियांवर चर्चा करणे आवश्यक वाटल्याने हा दुसरा भाग लिहायला घेतला. एका कार्यकर्त्याने लिहिले की, ‘नियोजन नसल्याने लोक कार्यक्रमाला कमी आलेत.’ 18 जून 2017 ला धुळ्याला ओबीसी जातींची व्यापक बैठक घेऊन ओबीसी जनगनना विषयाला चालना मिळाली. 27 व 28 जानेवारी रोजी दोन दिवसांची ओबीसी जनगणना परिषद शिर्डी येथे घेऊन राज्यस्तरीय जनगनना अभियानाचे रणसिंग फुंकले. धुळ्याला11 मार्चला एक दिवसाची ओबीसी जनगनना परिषद संपन्न झाली. 11 एप्रिल ते 11 मे पर्यंत पूर्ण एक महिनाभर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन, बैठका, सभा व पत्रकार परिषदा घेऊन ओबीसी जनगणना आंदोलन तळागाळापर्यंत नेलं! आता यापेक्षा वेगळं नियोजन ते काय करायचं! नंतर मी विचार केला की, या कार्यकर्त्याला ‘नियोजना’चा वेगळाच अर्थ सांगायचा आहे. ‘गर्दी जमविण्याचे नियोजन’ होय! अगदी बरोबर गर्दी जमविण्याचे हे नियोजन आम्ही केलेच नाही. लोकांना कार्यक्रमाच्या स्थळी आणण्यासाठी घरपोच गाड्या पाठवाव्या लागतात. रस्त्यावर पहिल्यांदा गाडी थांबली की त्यांना चहा-पाणी, नास्ता द्यावा लागतो. दुपारचे जेवण तेही बिर्याणी वगैरे! रात्री पुन्हा सभा संपल्यावर खासमखास नियोजन करावेच लागते. आता गर्दी जमविण्याचे हे नियोजन राजकीय निवडणूका डोळ्यासमोर ठेवून कोणी तरी एक नेता किंवा त्यांचे चेले करीत असतात. हे मी जनरल नियोजनाची रूढ पद्धत सांगतो आहे. बहुजन समाजातून नेतृत्व निर्मितीची ही पहिली पायरी आहे. एखाद्या पक्षाचे तिकीट मिळावे म्हणून किंवा मीच माझ्या जातीतील एकमेव नेता आहे, हे सिद्ध करण्यासाठी अशा गर्दींचे कार्यक्रम आयोजित केले जातात. पण अशा कार्यक्रमातून समाजाचे किती नुकसान होते, याची कुणीही चिंता करीत नाही.

समाजाला कोणताही विचार न देता, जनजागृती न करता केवळ गर्दीतून बनलेला नेता आपला किती असतो आणी प्रस्थापित जातींचा किती असतो, याचा विचार केला पाहिजे! आपल्या बहुजन समाजाला स्वतःचा नेता स्वतःच निवडण्याची अक्कल अजून आलेली नाही. नितीन गडकरी, फडणवीस, अटल बिहारी, प्रमोद महाजन, ठाकरे, पवार वगैरे असा एकतरी ब्राह्मण-क्षत्रिय नेता दाखवा कि, त्याने आपले नेतृत्व स्थापन करण्यासाठी आपल्या जातीची गर्दी जमविणारी लाखोंची सभा घेतली? गर्दी जमविण्याचे काम आमचे बहुजन नेते करतात व नंतर हे बहुजन नेते गडकरी, फडणवीस, ठाकरे, पवार वगैरेंना मुख्य नेता (बॉस) बनवितात. गडकरी, फडणवीस, ठाकरे वगैरे ब्राह्मण नेते गर्दी नाही जमवित, ते कुप्रबोधन करून जनजागृती करतात. लोकांच्या मनात आपल्या ब्राह्मण-जातीच्या हिताचे विचार व तत्वज्ञान रूजवितात. ते आधी लोकांची मतं तयार करतात आणी मग लोक आपलं हे मत ‘दान’ करून ब्राह्मणांच्या हिताची सत्ता स्थापन करतात. ‘मत-हक्क’ बजावण्याऐवजी आम्ही ‘मत-दान’ करतो. आणी वैदिक धर्मशास्त्राप्रमाणे दान घेण्याचा अधिकार तर ब्राह्मणांनाच असतो.

आम्ही जनगनना अभियान महाराष्ट्रभर राबविले. एप्रिल-मे च्या कडक उन्हात घरच्या भाकरी खाऊन तळागाळापर्यंत जनजागृती केली.आम्हाला वाटले लोक जागृत झालेत, स्वतःहून येतील. गाड्या-घोड्यांची वाट पाहणार नाहीत. पण प्रस्थापित राजकारण्यांनी लोकांना ज्या फुकट‘’खाण्या-पिण्या’’च्या सवयी लावून दिलेल्या आहेत, त्यातून शिकले-सवरलेले(?) बुद्धीमान(?) लोकही बाहेर यायला तयार नाहीत. झोपड-पट्टीमधील लोक पैशांशिवाय मतदान करीत नाहीत, अशी टिका करणारा हा मध्यम वर्ग जेव्हा स्वतःचा ‘शिक्षक-आमदार’ वा ‘पद्वीधर-आमदार’ निवडतो तेव्हा तो किती भ्रष्ट वागतो, याचे अनेक किस्से आहेत. असे नालायक लोक आपल्या महापुरूष बापाला काय इज्जत मिळवू देणार???

भारतात लोकशाही आहेच कुठे? लोकशाहीत लोक मुक्तपणे विचारपुर्वक व पक्षाच्या तात्विक धोरणांचा अभ्यास करून मताचा हक्क बजावतात. आपल्याकडे मतदान करणारे लोक सर्वात आधी जात, धर्म, पैसा आदी क्रमाने प्राधान्य देतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीअंतासाठी जी मार्गदर्शक तत्वे व कृती-कलमे घटनेत समाविष्ट केली आहेत, ती प्रामाणिकपणे राबविणारी नेते निवडून देण्याचे आवाहन केलं.तामिळनाडूची जनता स्वामी पेरियारच्या विचार-कार्याने जागृत असल्याने ते जयललितासारख्या ब्राह्मण-स्त्रीला मुख्यमंत्री म्हणून निवडतात.जातीअंताचा एक कार्यक्रम म्हणून संख्येच्या प्रमाणात आरक्षण-योजना तिथे राबविली जात आहे. परंतू केवळ जातीच्या नावाने कौटुंबिक-राजकारण करणार्‍या मायावती, लालू, मुलायम वगैरे जात-नेते आरक्षणाचे धोरणही नीट राबवू शकले नाहीत. लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देऊ शकलेले नाहीत. मंडल आयोगाची एकही ज्यादा शिफारस या बहुजन म्हणविणार्‍या नेत्यांनी आपल्या राज्यात राबविली नाही.

कारण हे नेते आपले बाप असलेल्या फुले-शाहू-आंबेडकरांचा केवळ जात-वारसा चालवितात, विचार-वारसा काय असतो, ते यांना माहीतच नाही.

गर्दी करून कार्यक्रमाला आलेत तर प्रस्थापित ब्राह्मणवादाचेच सरकार तुमच्या बोकांडी बसणार! मग सरकारमध्ये तुमच्या जातीचे लोक असलेत तरी ते तुमच्यासाठी काहीही करू शकणार नाहीत! वैचारिक जागृती घेऊन स्वतःहून कार्यक्रमाला आलेत तर नेताही तुमच्यासारखाच वैचारिक असेल व तो तुमच्यासाठी खूप काही करू शकेल, मग तो सरकारमध्ये नसला तरी आणी असला तरी! आपल्या महापुरूष बापाने -तात्यासाहेबाने- दिलेला विचार जीवंत ठेवायचा असेल तर या शिवाय पर्याय नाही.

काय माळी समाज असा जागृत होईल! केव्हा होईल? त्या दिवसाची वाट पाहू या…… तोपर्यंत जयजोती! जयभीम!!

------- प्रा. श्रावण देवरे