Breaking News

कदमांच्या भात्यात शिवसेनेचा बाण पलूस कडेगाव विधानसभा पोटनिवडणूक : शिवसेनेचा जाहीर पाठिंबा

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पलूस कडेगाव विधानसभा पोटनिवडणूकीसाठी कॅांग्रेसचे उमेदवार आणि पतंगराव कदम यांचे पुत्र विश्‍वजित कदम यांना शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवसेना उमेदवार देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. येथून पतंगराव कदम यांचे पुत्र विश्‍वजित कदम हे कॅांग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत. पतंगराव कदम हे सहकार, सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील एक कर्तबगार व दिलखुलास नेते होते. राजकारण व सहक ारात त्यांची भूमिका पक्षाच्या पलिकडे होती. हे सर्व पाहता पतंगराव कदम यांना श्रध्दांजली म्हणून पलूस कडेगावची विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी शिवसेनेची इच्छा होती. तसेच दुर्देवाने तसे होताना दिसत नाही. मात्र शिवसेना विश्‍वजित कदम यांना संपूर्ण तसेच सक्रिय पाठिंबा जाहीर करीत आहोत अशी भूमिका शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी जाहीर केली आहे.

सहकार क्षेत्रात पतंगराव कदम यांची भूमिका पक्षीय राजकारणाच्या पलीकडची होती. त्यांचे हे योगदान लक्षात घेऊन, त्यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही विश्‍वजीत कदम यांना पाठिंबा देत आहोत, असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे. दिवंगत नेते पतंगराव कदम यांची रिक्त झालेली पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी शिवसेनेची इच्छा होती. पण भाजपने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत ऐनवेळी संग्रामसिंह देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. संग्रामसिंह देशमुख जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष असून जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आहेत. संग्रामसिंह हे पृथ्वीराज देशमुख यांचे चुलत बंधू आहेत. संग्रामसिंह यांच्या उमेदवारीने पृथ्वीराज समर्थकांना धक्का बसला आहे. मुळात ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, भाजपने अचानक ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. आता शिवसेनेने विश्‍वजित कदम यांना जाहीर पाठिंबा देऊन भाजपला धक्का दिला आहे.