Breaking News

नगरपालिकेला पूर्णवेळ अधिकारीच नाही ; नगरध्यक्षांसह सर्वांचीच चुप्पी


राहुरी विशेष प्रतिनिधी : राज्यस्तरीय पुरस्कार मिळविलेल्या राहुरी नगरपालिकेच्या तीन प्रमुख अधिकारयांकडे राहुरीसह श्रीरामपूर, देवळाली प्रवरा, श्रीगोंदा या नगरपालिकेचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे राहुरी पालिकेची अनेक शहरातील नागरी विकास कामे ठप्प झाल्याचे चित्र पालिका प्रशासनात दिसत आहे. जिल्हाधिकारी, नगरविकास विभाग अहमदनगर या विभागाने याबाबत दखल घेण्याची मागणी राहुरी शहरवासियांमधून होत आहे.
नगरपालिकेचे मुख्यधिकारी, बांधकाम अधिकारी, आणि पाणी पुरवठा अधिकारी या तीनही अधिकाऱ्यांकडे इतर नगरपालिकेचा अतिरिक्त पदभार आहे. त्यामुळे राहुरी शहरातील विकासकामे ठप्प झाल्याचे उघड झाले आहे. मुख्यधिकारी नानासाहेब महानवार यांच्याकडे राहुरी नगरपालिकेसह देवळाली प्रवरा पालिकेचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. महानवार हे आठवड्यातून तीन दिवस राहुरी पालिकेत तर तीन दिवस देवळालीप्रवरा पालिकेत असतात. त्याचप्रमाणे राहुरी पालिकेचे बांधकाम विभागाचे अधिकारी सुरेश मोटे यांच्याकडे राहुरी, देवळालीप्रवरा व श्रीगोंदा या तीन नगरपालिकांचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. पाणी पुरवठा विभागातही अशीही परिस्थिती दिसून येत आहे. 

राहुरी पालिकेतील पाणी पुरवठा अधिकारी राहुल शिंदे यांच्याकडे राहुरी व श्रीरामपुर या नगरपालिकेचा पदभार देण्यात आला आहे. यामध्ये आठवड्यातून काही शासकीय सुट्ट्या असतात. राहुरी नगरपालिकेच्या या तीन प्रमुख अधिकारयांवर इतर नगरपालिकेचा बोजा पडल्याने अधिकारीही हातबल झाल्याचे दिसून येत आहे. या अधिकारयांवर अतिरिक्त पदभार सोपविण्यात आल्याने या अधिकारयांचे प्रशासनावर नियत्रंन राहत नाही. दैनंदिन कामे विस्कळीत होत आहेत. नागरी समस्या असलेल्या कागदोपत्रांवर सह्या होत नाहीत. त्यामुळे शहरातील विविध कामे ठप्प होत आहेत. परिणामी नागरिक मेटिकुटीस आल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हा नगरविकास अधिकारी यांनी या बाबत लक्ष देण्याची गरज आहे.


राहुरी पालिकेला पूर्णवेळ इलेक्ट्रिक इंजिनियर नाही. पाणी पुरवठा इंजिनियर नाही. बांधकाम अधिकारी यांच्याकडे राहुरीसह श्रीगोंदा व देवळालीप्रवराचा पदभार आहे. मुख्यधिकारी महानवर यांच्याकडे राहुरीसह देवळालीचा पदभार असे दोन पदभार पालिका विभागात. काय चाललंय, काही कळत नाही. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दखल न घेतल्यास लवकरच आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. 
दादा पाटील सोनवने, विरोधी पक्षनेते.