गोदावरी’च्या उदरातून अनिर्बंध वाळू उपसा सुरूच!
कोपरगाव : गणेश दाणे - कोपरगाव तालुक्याला गोदावरी नदीचा २५ किलोमीटरचा तट लाभला आहे. त्यामुळे कोणाला पाणी तर कोणाला वाळूचोरीसाठी ती वरदायिनी ठरत आहे. बेसुमार वाळूउपशामुळे कोपरगाव शहरापासून वैजापूर तालुक्याच्या हद्दीपर्यंत नदीपात्र पूर्ण उघडे झाले आहे. या नदीपात्रात केवळ खडकांचे साम्राज्य पहावयास मिळते. नदीपात्रात वाळूच नसल्याने पशुपक्षांसाठी पाण्याचा एक थेंबदेखील अमृतासमान झाला आहे. कै. कर्मवीर शंकरराव काळे यांनी न्यायालयात जाऊन धारणगाव, कुंभारी परिसरातील वाळूवर निर्बंध आणल्यामुळे काही काळ का होईना त्याठिकाणचे पात्र वाळूमय होते. परंतु हे निर्बंध उठविण्यात आल्यामुळे आणि शासनाने लिलाव केल्यामुळे बेसुमार वाळू उपसा सुरु आहे.
या वाळू उपशाप्रकरणी महसूल आणि पोलिस प्रशासनाने ‘खमकी’ भूमिका न घेतल्यामुळे वाळूवर टोळधाड तुटून पडली आहे. परिणामी येथे बेसुमार वाळू उपसा सुरु आहे. वाळू वाहतुकीच्या मोठमोठ्या डंपरमुळे शहरासह परिसरातील रस्त्यांची पूर्णपणे ‘वाट’ लागली. त्यामुळे अनेकांनी सोशल मिडियावर आपल्या भावनांना पायवाट मोकळी करुन दिली. माध्यमांनी हा प्रश्न चांगलाच उचलून धरला. त्यामुळे शेवटी आमदारांना वाळूवर तहसिल कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करावे लागले. त्यात लोकप्रतिनिधींच्या आरोप प्रत्यारोपांची मैफल चांगलीच गाजली. महसूल विभागावरही प्रतिदिन लाखो रुपयांचा हप्तेखोरीचा आरोप झाला. सामाजिक कार्यकर्त्यांनीही महसूलच्या उणिवांचे वाभाडे काढले. बैठक संपली तरीही सोशल मिडियावरील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतच आहेत.
गोदावरी नदी तालुक्याच्या उशाला असूनही शहर आणि ग्रामीण भागातील पंतप्रधान आवास योजनेतील घरकुले आणि सर्वसामान्य कुटुंबांना याच वाळूच्या डंपरसाठी २५ हजारांची रोकड मोजावी लागते. नदीपात्रातील पाणी कमी झाल्यावर तरी वाळूचे भाव कमी होतील, या आशेवर राहून पावसाळा महिन्यावर येऊन ठेपला तरी वाळूचे भाव कमी होण्यापेक्षा भडकतच आहेत.त्यामुळे आर्थिक तरतूद नसलेल्यांची घरांची कामे रखडली. दरम्यान, तालुक्याच्या वाळूचोरीवर माजी आ. अशोक काळे यांनीही चांगलीच कंबर कसली होती. परंतु लोकप्रतिनिधींपेक्षा शासकीय अधिकाऱ्यांची मानसिकता बदलली तरच या प्रकाराला आळा बसणे शक्य असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे.
समृद्धी महामार्गामुळे वाळूला सोन्याचे मोल
तालुक्यातून समृद्धी महामार्ग जात असून शासनाने जमिनीही संपादित केल्या. त्यामुळे या महामार्गासाठी लागणारी वाळूही आरक्षित होऊन कोणाला मूठभरही वाळू मिळणार नाही, अशी गावागावांत चर्चा आहे. त्यामुळे भविष्यातील बांधकाम नजरेसमोर ठेऊन नागरिक अव्वाच्या सव्वा रक्कम वाळू खरेदी करत आहेत. त्यामुळे सध्यातरी वाळूला सोन्याचे मोल आले आहे.
एकमेकांचा पाणउतारा अशोभनीयच
वाळू आढावा बैठकीत अधिकारी, लोकप्रतिनिधींनी एकमेकांवर आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. या बैठकीनंतर अब्रुनुकसानीचे दावे दाखल करण्याची भाषा वापरली गेली. अधिकाऱ्यांनीही यात उडी घेतली होती. मात्र त्यानंतर सर्वांनीच पाळलेलय मौनाचे उत्तर मात्र जनतेला मिळाले नाही. ऋषी, मुनींच्या, संतांच्या आणि साखर उद्योगाने देशात नावलौकिक कमावलेल्या तालुक्यात सुरु असलेला एकमेकांचा पाणउतारा अशोभनीय असल्याची जनमतात चर्चा आहे.