Breaking News

कोळसा विक्रीसाठी जंगलसंपदा उध्वस्त वृक्षतोडीच्या प्रमाणात वाढ दररोज शेकडो वृक्षांची कत्तल वनविभागाची डोळेझाक

कुळधरण / प्रतिनिधी । कर्जत तालुक्यातील खेड व परिसरातील आखोणी, भांबोरा गावात अवैधरीत्या वृक्षतोड करून कोळसा डेपोचा व्यवसाय मोठ्या तेजीत होत आहे. संबंधित ठेकेदार गावातील प्रतिष्ठितांना आपल्या हाताशी धरून प्रतिदिनी शेकडो झाडांची कत्तल करत आहेत. शिरापूर (ता.दौंड) येथील ठेकेदाराकडून कर्जत तालुक्यातील जंगलांना आपले लक्ष्य केले जात आहे. काही दिवसांपूर्वी आखोणी येथील हद्दीत वृक्षतोड करून कोळसा तयार करण्यात येत असल्याची तक्रार वनविभागाला करण्यात आली होती. वनविभागाने प्रत्यक्ष या ठिकाणी भेट देवून घटनास्थळाची पाहणी केली होती. मात्र ठेकेदाराने तोडलेली झाडे आमच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे सांगून वनविभागाने आपली जबाबदारी झटकली.


असे असले तरी, बेसुमार होणारी वृक्षतोड ही वनविभाग, पोलिस यंत्रणा यांना हाताशी धरून होत असल्याची चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे. ठेकेदार तालुक्यातील असून यावर कारवाई करण्यास कोणीही धजावत नसल्याचे चित्र आहे. शासन स्तरावरून एकीकडे झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना राबविण्यावर भर देण्यात येत असला तरी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या योजना केवळ कागदावरच दिसून येत आहेत. 


वृक्षांचे संरक्षण करणारे वनविभागामार्फत वृक्षतोड करणारांना पाठबळ देत असेल तर मग वृक्ष लागवडीचे कितीही धडे विद्यार्थ्यांना तसेच विविध स्तरांवर गिरविल्यास त्याचा तिळमात्र फायदा होणार नाही. तालुक्यातील तहसिलदार, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दरवर्षी काही कोटी वृक्षलागवड करण्याचा मानस धरतात, त्याचबरोबर काही प्रमाणात वृक्षलागवड केलीही जाते, काही वेळा त्या वृक्षांचे संवर्धनही केले जाते, झाडे मोठीही होतात, मात्र त्यावर असे काहीजण त्याची तोडणी करण्यासाठी तग धरूणच बसलेले असल्याचे दिसून येतात.