Breaking News

दुरगाव तलाव पिचिंगवर काटेरी झुडपांचे साम्राज्य भरावावर झाडे वाढल्याने धोका वाढला


कर्जत-कुळधरण या मुख्य रस्त्यालगत असलेल्या तालुक्यातील सर्वाधिक पाणीधारण क्षमतेच्या दुरगाव तलावाची पिंचिंग उचकटलेली असुन तलावाच्या भरावावर मोठमोठी झाडे वाढल्याने भरावास धोका निर्माण झाला आहे.
दुष्काळात तालुक्याची तहान भागविणारा तलाव अशी या तलावाची ओळख आहे. टंचाई काळात कुकडी धरणाचे पाणी सोडुन या तलावातुन कर्जत, जामखेडसह इतर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा होतो. मात्र सध्या तलावाच्या दुरावस्थेमुळे तलावाला धोका निर्माण झाला असुन सिंचन विभाग याकडे डोळेझाक करत असल्याचे दिसून येत आहे.

तालुक्याला संजीवनी ठरलेला असतानाही तलावाच्या देखभालीकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. त्याची भविष्यात मोठी किंमत कर्जत तालुक्याला मोजावी लागेल. दुरगाव तलावाच्या आतील बाजुच्या दगडांनी बनविलेली पिचिंग उचकटुन गेली आहे.दगड घसरुन तलावाच्या पाण्यात पडले आहेत. तर काही दगडांचे जागोजागी ढीग बनले आहेत. त्यामुळे भरावाची माती उघडी पडली असुन पाण्याच्या लाटा त्यावर आदळुन भराव जीर्ण होत आहे. भरावावर झाडेझुडपे वाढली असुन त्यांच्या मुळ्यांनी दगड उचकटले जात आहेत. भराव पोखरला जात असुन फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. तलावाखालील दुरगाव, थोटेवाडी या गावांसह हजारो एकर क्षेत्रास त्याचा धोका पोहचू शकतो.
तलावाच्या भरावावरुन सर्रासपणे वाहने नेली जात असल्याने भरावावर खड्डे पडले आहेत. अनेक वर्षापासुन भरावावरील झाडे, झुडपे हटविण्यात आली नाहीत. सिंचन विभागाच्या दुर्लक्षामुळे भविष्यात मोठी वित्त तसेच मनुष्यहानी होवू शकते. हा तलाव पाटबंधारे विभागाकडून कृष्णा खोरे महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. या विभागाचे शाखा कार्यालय कुळधरण येथे असुन उपविभाग राशीनला आहे. कार्यकारी अभियंता कार्यालय श्रीगोंदा येथे आहे. या कार्यालयातील यंत्रणेकडुन या तलावाच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने भिती निर्माण झालेली आहे. यावर सिंचन विभागाचे अधिकारी यावर काय कार्यवाही करणार याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


अन्यथा वित्तहाणीसह जीवितहाणी
सिंचन विभागामार्फत परिसरासाठी संजिवणी असणार्‍या तलावाची देखभाल केली जात नसल्याचे दिसून येत आहे. या तलावाचा भराव वाहणांच्या येण्या-जाण्याने काही प्रमाणात खचला गेल्याने भराव फुटण्याची शक्यता अधिक प्रमाणात वाढली आहे. 
तसेच पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. वातावरणातील बदल दिवसेंदिवस आपणास पावसाळा सुरू होण्याची चिन्हे दाखवत आहेत. हवामान खात्याने यावर्षीही अधिक प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यातच जर या तलाव परिसरात अधिक पाऊस होऊन जर या तलावाचा भराव दुभंगला तर याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल नागरिक विचारत आहेत.