चोरट्यांनी सुवर्णकाराला १५ लाखांना लुटले
संगमनेर : शहरातील बसस्थानक पररिसरात काल {दि. १० } दोन अज्ञात चोरट्यांनी सुवर्णकाराला १५ लाखांना लुटल्याची घटना रात्री दहाच्या सुमारास घडली. शिवाजी मैड हे शहरातील मेनरोड भागातील त्यांचे दुकान बंद करून घरी जात होते. बसस्थानक परिसरात दुचाकीवरून भरधाव वेगाने आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी मैड यांना धक्का देऊन त्यांच्या ताब्यातील पैशांची पिशवी हिसकावून नगर रस्त्याकडे धूम ठोकली.
मैड व त्यांच्याबरोबर असलेल्या मित्राने चोरट्यांचा पाठलाग केला. समनापूर गावच्या हद्दीत डाळिंबाच्या शेतात चोरट्यांच्या ताब्यातील दुचाकी घसरल्याने ते दोघे खाली पडले. यातील एका चोरट्यास पकडण्याच्या प्रयत्नात दुसरा चोरटा रक्कम व मोटारसायकल घेवून पसार झाला. यानंतर घटनेची माहिती नागरिकांनी पोलीसांना कळविल्यानंतर पोलीस समनापूर येथे दाखल झाले. पकडलेल्या चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.