राहुरी- शनिशिंगणापूर रस्ता : जमीन हस्तांतरण अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना
राहुरी बहुचर्चित राहुरी- शनिशिंगणापूर रस्ता चौपदरी होणार असून त्यासाठीच्या प्रशासकीय हालचालीदेखील वेगवान झाल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून नवी दिल्ली येथील सडक परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने या २७ किलोमीटर मार्गावरील जमीन हस्तांतरणाचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सर्व्हेक्षण होताच जमिन हस्तांतरणाचे राजपत्र प्रसिद्ध होणार आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असलेल्या शिर्डीपाठोपाठ शनिशिंगणापूर या धार्मिक पर्यटनक्षेत्राचा विकास होणे आवश्यक आहे. या क्षेत्रांना जोडणारे रस्ते मात्र विकसित नव्हते. शिर्डी ते राहुरीपर्यंतचे रस्ते विस्तारले. मात्र राहुरी ते शनिशिंगणापूर रस्ता विस्तार होण्याची गरज होती . परंतु राजकीय इच्छाशक्ती कमी पडत होती. गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढले आहे. परिणामी या अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडीही वाढली. आता हा रस्ता पेवर शोल्डरसह दुपदरी आणि चौपदरी होणार आहे. नवीदिल्ली येथील सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाचे उपसचिव राजेश गुप्ता यांनी नुकतीच अधिसूचना जाहीर केली. हे कर त असतांना जमीन हस्तांतरणाचे अधिकार त्यांनी श्रीरामपूर आणि नगर येथील उपविभागीय अधिकारी यांना दिले.
राष्ट्रीय महामार्ग क्र. १६० सी (नगर-कोपरगाव रस्ता ) च्या राहुरी खुर्द ( सोनई फाटा) ते शनिशिंगणापूर आणि तेथून राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ ( नगर-औरंगाबाद रस्ता ) घोडेगावपर्यंतचे रस्त्यालगतच्या जमिनींचे हस्तांतरण केले जाणार आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण झाल्यावर जमीन हस्तांतरणाचे राजपत्र प्रकाशित करण्याबाबत नमूद केले आहे. राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्यालगतच्या राहुरी खुर्द, पिंप्री अवघड, उंबरे, ब्राह्यणी, सोनई, शनिशिंगणापूर, तामसवाडी, वंजारवाडी, कांगोणी व घोडेगाव येथील जमिनींचे हस्तांतरण केले जाणार आहे.