Breaking News

… तर नगराध्यक्षांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा : तहसीलदार कदम


कोपरगांव : नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी १० लाख रूपये रोज हप्ता घेत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी तो सिध्द करून दाखवावा. अन्यथा त्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे तहसिलदार किशोर कदम यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. 
ते म्हणाले, संपूर्ण कारकिर्दीत वाळू तस्करांकडून साडेचार कोटी रूपयांचा महसूल वसूल करत ३५५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. कोपरगांव तालुक्यात गोदावरी नदीकाठी असणा-या ३२ गावांत वाळू आहे. त्यापैकी पाच ठिकाणचे वाळू लिलाव झाले आहेत. धारणगांव क्रमांक दोन व मायगांवदेवी या दोन ठिकाणांहून प्रत्यक्षात वाळू उपसा सुरू आहे. तहसील कार्यालयात दोन अधिका-यांसह १५ ते २० कर्मचा-यांचा तुटवडा आहे. वाहनांचाही तुटवडा आहे. पोलिस बळही अपुरे आहे. त्यामुळे आम्ही वाळू चोरटयांपर्यंत पोहोचवू शकत नाही. दरम्यान, या दोन ठिकाणी पाच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यावर सामाजिक माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी हस्तक्षेप घेत सीसीटीव्ही फुटेज का देत नाही, अशी विचारणा केली. मात्र त्यावर तहसिलदार कदम निरूत्तर झाले. सन २०१६- १७ मध्ये १४९ बेकायदा वाळू वाहणा-या वाहनांवर कारवाई करत त्यांच्यापैकी २ कोटी ४६ लाख दंड वसूल केला. त्यात ४८ वाहनांवर चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे तहसीलदार कदम यांनी सांगितले.