Breaking News

ताजनापूर लिफ्ट योजनेत सालवडगाव व खरडगाव या दुष्काळी गावांचा समावेश करण्याची मागणी


शेवगाव - शेवगाव तालुक्यातील ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र. 2 मध्ये सालवडगाव व खरडगाव या दोन गावांचा समावेश व्हावा, अशी मागणी शेवगाव - पाथर्डी जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजीराव काकडे व जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी केली आहे. अ‍ॅड. काकडे यांच्या नेतृत्वाखाली सालवडगाव व खरडगाव येथील शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने औरंगाबाद येथे मराठवाड्याचे विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर व गोदावरी खोरे अभियंता कोहीलकर यांची भेट घेऊन या मागणीचे निवेदन देत त्यांच्याशी चर्चा केली. 

या वेळी अ‍ॅड. काकडे म्हणाले, ताजनापूर लिफ्ट क्र. 2 चे काम शेवगाव तालुक्यात सुरू असून योजनेत खानापूर, अंतरवाली, घोटण, नजीक बाभूळगाव, राक्षी, कुरूडगाव, रावतळे, माळेगावने, गदेवाडी, ठाकूर निमगाव, सोने सांगवी, कोळगाव, हसनापूर, वरखेड, चापडगाव, दहिगावशे, प्रभुवाडगाव, मंगरूळ बुद्रुक, मंगरूळ खुर्द, अंतरवाली बुद्रुक या गावांचा समावेश आहे. प्रकल्पाच्या विलंबामुळे खानापूर, गदेवाडी, अंतरवाली, घोटण, बाभूळगाव, राक्षी, कुरूडगाव, रावतळे या गावातील मोठ्या शेतकर्‍यांनी व्यापक प्रमाणात स्वखर्चाने जायकवाडी धरणातून पाईपलाईनने पाणी शेतात आणले असून आजमितीला हा भाग 80 ते 90 टक्क्यांवर ओलिताखाली आला आहे. त्यामुळे या गावांसाठी राखीव असणारे पाणी शिल्लक राहिलेले आहे. हे शिल्लक पाणी दुष्काळाने भरडलेल्या सालवडगाव व खरडगाव या दोन गावांना मिळाले तर या गावांतील शेती ओलिताखाली येईल. 

या गावातील शेतीला शाश्‍वत पाणी मिळण्याची कुठलीही सुविधा मिळण्याची शक्यता नसल्याने या गावांचा ताजनापूर लिफ्ट मध्ये समावेश होण्याची गरज आहे. जुलै 2009 मध्ये गोदावरी खो-याचे कार्यकारी संचालक यांच्याकडे लेखी मागणी करण्यात आल्याचे अ‍ॅड. काकडे यांनी स्पष्ट केले. या वेळी रघुनाथ गिरमकर, रावसाहेब म्हस्के, हेमंत पातकळ, शरद भापकर, नारायण टेकाळे, शामराव ठोंबरे, गोरक्षनाथ भोसले, चंद्रभान कमानदार, बाबासाहेब भापकर, मच्छिंद्र टेकाळे, भाऊराव टेकाळे, भाऊसाहेब म्हस्के, तुळशीराम रूईकर, गोरक्ष टेकाळे, तुकाराम बोडखे यांच्या सह सालवडगाव व खरडगाव गावातील शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते.