Breaking News

उद्योग क्षेत्रात महिला उद्योजकांचा टक्का वाढविणार - सुभाष देसाई


नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या उद्योग क्षेत्रात महिलांचा वाटा सध्या 9 टक्के आहे, पुढील पाच वर्षात तो 20 टक्क्यांपर्यंत नेण्याचा शासन प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.

‘पुढचे पाऊल’ ही दिल्लीतील संस्था व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने येथील कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात “उद्योजकता, महाराष्ट्राचे अर्थकारण आणि व्यापाराच्या संधी” या विषयावर आयोजित चर्चासत्रात श्री सुभाष देसाई बोलत होते. यावेळी केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू मंचावर उपस्थित होते.

यावेळी श्री. देसाई म्हणाले, महिला उद्योजकांना शासन भांडवल उपलब्ध करून देणार असून या भांडवलात राज्य शासन निम्मा वाटा उचलणार आहे. विदेशात उद्योगविषयक प्रदर्शन भरविण्यासाठी महिला उद्योजकांना 50 लाख रूपयांचे अनुदान शासन देणार आहे. तसेच वीज दरातही सवलत देण्यात येईल अशी माहिती श्री.देसाई यांनी यावेळी दिली.