Breaking News

शेतकर्‍यांसह साखर चळवळ अडचणीत : अनिल घनवट


श्रीगोंदा :  साखर आयाती बाबत अपुर्‍या माहितीमुळे काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला असला तरी, साखर उद्योगाची अवस्था सुधारण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदारांनी मिळून सरकारवर दबाव निर्माण करावा लागेल असे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

मुंबईत पाकिस्तानी साखर आल्याच्या बातम्या वर्तमान पत्रात झळकल्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी संधीचा फायदा घेत निदर्शने केली, गोडाउन फोडले व साखरेची नासधूस केली. शेतकरी संघटनेने सतत शेतीमालाची अनावश्यक आयातीला विरोध केला आहे. शेती व्यापारातील व साखर उद्योगातील सरकारी हस्तक्षेप कायम स्वरुपी संपावा ही शेतकरी संघटनेची सुरुवातीपासूनची मागणी आहे.
 
साखर उद्योग अडचणीत येण्यास केंद्र शासनाचे धरसोडींचे धोरण जवाबदार आहे. भारतातील साखर उद्योगावर आज ही अनेक बांधणे आहेत. निर्यात व साठ्यांच्या बाबतीत कायमस्वरूपी धोरण नसल्यामुळे साखर कारखानदार व व्यापार्‍यावर कायमची टांगती तलवार असते. साखर उद्योग कायमस्वरुपी पूर्णं निर्बंधमुक्त केला तरच ही समस्या सुटू शकते. देशात या वर्षी किती साखर उत्पादन होणार या बाबत निश्‍चित आकडेवारी सरकारकडे नसते त्यामुळे पुढील नियोजन ही ढासळते. ऊस उत्पादकांनी साखर कारखानदारांना शत्रू न समजता त्यांना बरोबर घेऊन आंदोलन उभे करावे, त्यातच ऊस उत्पादकांचे व साखर उद्योगाचे हित आहे असे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.