Breaking News

रविवारी राळेगणसिद्धीत सामाजिक कार्यकर्ता शिबिर


सुपा : पुण्यातील आशिया मानवशक्ती विकास संस्थेच्या वतीने आणि नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी तसेच भोसरीतील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (दि.20) राळेगणसिद्धीत सामाजिक कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण अण्णा हजारे यांचे हस्ते रविवारी 9.30 वाजता होणार असल्याची माहिती संयोजक समितीचे मुख्य निमंत्रक पुरुषोत्तम सदाफुले, समन्वयक मुरलीधर साठे यांनी दिली.

राळेगणसिद्धी येथे रविवारी स. 9.30 ते सायं. 4 या वेळेत हे सामाजिक कार्यकर्ता शिबिर पार पडणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून नारायण सुर्वे अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे असणार आहेत. या शिबिरात पुण्याचे माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, ज्येष्ठ समाज सुधारक गिरीश प्रभुणे, सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, टाटा मोटर्सचे मनोहर पारळकर, आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन तज्ज्ञ राज मुछाल मार्गदर्शन करणार आहेत.
राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका, खेड्याकडे चला ही चळवळ होईल का?, सामाजिक कार्यकर्ता जडण-घडण, समाज विकासाची वाटचाल आणि संघटन कौशल्य व व्यवस्थापन कौशल्य या विषयांवर शिबिरात मंथन होणार आहे. सद्यस्थितीत आपला देश अनेक संकटातून वाटचाल करत असताना राष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि नव्याने राष्ट्र उभारणीसाठी निष्ठावंत व राष्ट्रप्रेमी कार्यकर्त्यांची नितांत गरज भासत आहे. त्यामुळेच सामाजिक कार्यकर्त्यांसाठी एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे निमंत्रक उद्धव कानडे, अरुण शेंडे, अनिल कातळे, दत्तात्रय येळवंडे, रोहित खर्गे, सुरेश कंक यांनी सांगितले .

संजोयक समितीचे मुख्य निमंत्रक पुरुषोत्तम सदाफुले, समन्वयक मुरलीधर साठे, निमंत्रक उद्धव कानडे, अरुण शेंडे, अनिल कातळे, दत्तात्रय येळवंडे, जनसंपर्क अधिकारी रोहित खर्गे, सुरेश कंक यांनी सक्रीय सहभाग घेतला आहे.